न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपळे सौदागर (दि. ०७ सप्टेंबर २०२५) :- ट्रायोज-झुलेलाल टॉवर सोसायटी परिसरातील रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून खड्ड्यांनी विद्रूप झाला होता. पावसाळ्यातील चिखल, पाण्याचे डबके, वाहतुकीतील अडथळे व वारंवार होणारे अपघात यामुळे नागरिक त्रस्त झाले होते.
या गंभीर समस्येची दखल घेत नगरसेवक तथा भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापु) काटे यांनी स्मार्ट सिटी विभागाकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा केला. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले असून रस्त्याच्या काँक्रेटरीकरणाच्या कामाला सुरुवात झाली आहे. कामाच्या प्रारंभप्रसंगी काटे यांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधत या कामाविषयी माहिती दिली.
शत्रुघ्न काटे म्हणाले, नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित प्रश्न सोडवणे हीच खरी जनसेवा आहे. सौदागर परिसरातील रस्त्यांचा दर्जा उंचावण्यासाठी व नागरिकांना दर्जेदार, खड्डेमुक्त रस्त्यांची सुविधा देण्यासाठी मी कटिबद्ध आहे. विशेष म्हणजे, या रस्त्यालगत असलेल्या शाळांमुळे शेकडो विद्यार्थ्यांना सुरक्षित व सोयीस्कर प्रवासाचा मोठा लाभ होणार आहे. या काँक्रेटरीकरणामुळे परिसरातील नागरिकांची वर्षानुवर्षांची मागणी पूर्ण झाली असून आता खड्डेमुक्त, कायमस्वरूपी रस्त्याचे स्वप्न साकार झाले आहे.
या प्रसंगी विजय जगताप, संजय भिसे, कुंदाताई भिसे, धनंजय भिसे, अनिल काटे, सोसायटी पदाधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.












