न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिंचवड (दि. ०७ सप्टेंबर २०२५) :- इंद्रायणी नदी स्वच्छता जनजागृती मोहिमेअंतर्गत अविरत श्रमदान, सायकल मित्र, महेशदादा स्पोर्ट्स फाऊंडेशन आणि निर्विकार आयुर्वेद हॉस्पिटल या संस्थांकडून सलग ९ वर्षांपासून पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा उपक्रम राबवला जात आहे.
यंदाही गणपती विसर्जनाच्या दिवशी मोशी घाट, इंद्रायणी नदी येथे मूर्ती दान आणि निर्माल्य दान उपक्रम पार पडला. या उपक्रमामुळे नदी प्रदूषण कमी होण्यास मदत झाली, संकलित मूर्ती व निर्माल्याचा पुनर्वापर साध्य झाला आणि नागरिकांमध्ये पर्यावरणपूरक सण साजरा करण्याची जनजागृती झाली.
संस्थांचे प्रतिनिधी सचिन लांडगे आणि वैद्य निलेश लोंढे म्हणाले की, गणेशोत्सव हा आनंदाचा सण असला तरी पर्यावरण रक्षण ही सामूहिक जबाबदारी आहे. निसर्गाशी सुसंगत संस्कार रुजवणे ही काळाची गरज आहे. सलग नऊ वर्षे चालणारा हा उपक्रम आता इंद्रायणी नदी स्वच्छता जनजागृती मोहिमेचा महत्त्वाचा भाग बनला असून स्थानिक समाजाकडून त्याचे कौतुक होत आहे.












