- पुणे-नाशिक महामार्गाला उन्नत मार्गाचा दिलासा..
- पीएमआरडीएकडून सात गावांमध्ये भूसंपादन प्रक्रिया सुरू…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० सप्टेंबर २०२५) :- पुणे-नाशिक महामार्गावरील नाशिक फाटा ते राजगुरूनगर (खेड) या २८ किलोमीटर अंतरावर उन्नत मार्ग (Elevated Corridor) उभारला जाणार आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक अॅप्रोच रॅम्प तयार करण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीत भूसंपादनाचे काम सुरू झाले आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६० वर हे काम भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण हाती घेणार असून, खेड तालुक्यातील चिंबळी, नाणेकरवाडी, मेदनकरवाडी, वाकी खुर्द, कुरुळी, वाकी बुद्रुक आणि चाकण या गावांमधील एकूण ९.७४ हेक्टर जमिनीचे संपादन होणार आहे. यासाठी सुमारे १५० शेतकरी व जमिनमालकांना संपादन प्रक्रियेत सहभागी केले जात आहे.
भूसंपादनाबाबत काही ठिकाणी जमिनमालकांनी विरोध दर्शवला असला तरी प्रशासनाने समन्वय साधण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. खासगी वाटाघाटी निष्फळ ठरल्यास सक्तीचे संपादन करण्यात येईल, असा प्रस्तावही तयार करण्यात आला आहे. पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी या प्रकल्पाला गती देण्यासाठी तातडीने मोजणी व संपादन पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
वाहतूक कोंडीवर मोठा उपाय…
सध्या नाशिक फाटा चौक ते राजगुरूनगर या ३० किलोमीटर अंतराचा प्रवास करायला दीड ते दोन तास लागतात. उन्नत मार्ग तयार झाल्यानंतर हेच अंतर अवघ्या २५ मिनिटांत पार करता येणार आहे. विशेषतः चाकण औद्योगिक क्षेत्रात होणारी वाहतूककोंडी मोठ्या प्रमाणात कमी होऊन वाहनचालकांना मोठा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.













