न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० सप्टेंबर २०२५) :- चिखलीतील शेलार वस्ती परिसरातील खाणीत पोहण्यासाठी गेलेल्या १७ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. मंगळवारी (दि. ९) दुपारी अग्निशामक दलाने पाण्यातून त्याचा मृतदेह बाहेर काढला.
मृत तरुणाची ओळख मनोज चव्हाण (वय १७, रा. तळवडे) अशी आहे. सोमवारी सायंकाळी तो आपल्या मित्रांसोबत शेलार वस्ती भागातील खाणीत पोहायला गेला होता. पोहताना तो अचानक पाण्यात बुडाला. हा प्रकार पाहून सोबतचे मित्र घाबरले आणि काहीही न सांगता घटनास्थळावरून निघून गेले.
दरम्यान, मनोज घरी परतला नसल्याने नातेवाईकांनी शोधमोहीम सुरू केली. चौकशीत मंगळवारी सकाळी त्याच्या मित्रांनी खरी माहिती दिली. यानंतर चिखली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशामक दलाच्या जवानांनी दुपारी शोध घेत त्याचा मृतदेह बाहेर काढला. शवविच्छेदनासाठी त्याला यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात हलविण्यात आले असून, त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.













