न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपळे सौदागर (दि. १० सप्टेंबर २०२५) :- चॅलेंजर पब्लिक स्कूलमध्ये शिक्षक दिनानिमित्त भारतरत्न, तत्त्वज्ञ आणि माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व डॉ. राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून करण्यात आली.
शाळेचे संचालक संदीप काटे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना म्हटले की, “शिक्षक हा केवळ ज्ञान देणारा नसून तो विद्यार्थ्यांच्या जीवनाचा शिल्पकार असतो. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी आपल्या आयुष्यभर शिक्षकाचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांचे व्यक्तिमत्त्व हे प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. आजच्या काळात तंत्रज्ञान, स्पर्धा आणि बदलत्या जीवनशैलीमध्ये शिक्षकांचे कार्य अधिक जबाबदारीचे झाले आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षकांचा आदर ठेवून त्यांच्याकडून घेतलेले शिक्षण प्रत्यक्ष आयुष्यात उतरवले पाहिजे. चॅलेंजर पब्लिक स्कूल ही संस्था केवळ शिक्षण देण्यासाठी नाही, तर जबाबदार नागरिक घडवण्यासाठी प्रयत्नशील आहे.”
शाळेच्या प्राचार्या सुविधा महाले यांनी असे म्हटले, “डॉ. राधाकृष्णन यांनी शिक्षकांच्या कार्याला इतके महत्त्व दिले की त्यांच्या वाढदिवसाला आज आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो. शिक्षक हे समाजाचे मार्गदर्शक, संस्कारकर्ते आणि प्रेरणास्त्रोत आहेत. विद्यार्थी हा एक कोरा कागद असतो आणि शिक्षक त्यावर ज्ञान, मूल्ये आणि संस्कारांची अक्षरे उमटवतात. चांगले समाजजीवन उभे करण्यासाठी चांगल्या शिक्षकांची गरज आहे. या निमित्ताने मी सर्व शिक्षकांना सलाम करते आणि विद्यार्थ्यांना आवाहन करते की त्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा.”
विद्यार्थिनी अनन्या तुळसे (इयत्ता ८ वी) हिने आपल्या भाषणातूण शिक्षकांचे आभार मानले व “आपल्या देशाला ज्ञान, संस्कृती आणि विचारांची परंपरा डॉ. राधाकृष्णन यांच्यासारख्या महान तत्त्वज्ञांकडून मिळाली आहे. त्यांनी शिकवलेले मूल्य म्हणजे आदर, शिस्त आणि कर्तव्यभावना. मला माझ्या शिक्षकांविषयी नेहमी कृतज्ञता वाटते कारण ते केवळ अभ्यास शिकवत नाहीत तर जीवन कसे जगायचे हे देखील शिकवतात. शिक्षकांचा आदर करणे हेच खरे शिक्षण आहे. आजच्या या शिक्षक दिनाच्या निमित्ताने मी माझ्या सर्व शिक्षकांचे आभार मानते.”
या कार्यक्रमास शिक्षकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते. संपूर्ण वातावरणात उत्साह आणि प्रेरणादायी ऊर्जा अनुभवायला मिळाली.













