न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० सप्टेंबर २०२५) :- महापालिकेतील दालन समितीचे अस्तित्व केवळ कागदोपत्री राहिले असून, प्रत्यक्षात वरिष्ठ अधिकारी मनमानी करत दालनांवर कब्जा करत आहेत. मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी सेवानिवृत्त होताच त्यांच्या जागेवर प्रतिनियुक्तीवर आलेले सहायक आयुक्त अमित पंडित यांनी औपचारिकता पूर्ण न करताच प्रशस्त दालनावर कब्जा केल्याची घटना नुकतीच घडली.
महापालिकेत अधिकारी सेवानिवृत्त झाल्यावर दालनांचा ताबा कोणाला द्यायचा, याबाबत दालन व्यवस्था समिती अस्तित्वात आहे. या समितीमार्फत निर्णय होणे अपेक्षित असतानाही, प्रत्यक्षात मात्र “जो पुढे तो दालनाचा मालक” अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. शासनसेवेतील प्रतिनियुक्त अधिकारी यात सर्वात आघाडीवर असल्याचे कर्मचारी सांगतात.
दालन व्यवस्था समितीचे अध्यक्ष अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील आणि इतर अधिकारी यात सामील असून, त्यांच्या मान्यतेनंतरच कोणत्या अधिकाऱ्याला कोणते दालन द्यायचे याचा निर्णय व्हायला हवा. पण, सततच्या दालनबाजीमुळे ही समिती फक्त नावापुरती असून अधिकारी आपल्या सोयीनुसार आसन निश्चित करत असल्याचे स्पष्ट झाले आहे.













