न्यूज पीसीएमसी नेटवर्क
ताथवडे (दि. १० सप्टेंबर २०२५) :- चिंतामणी पेट्रोलपंप, अशोक नगर, ताथवडे येथे रविवारी (दि. ८ सप्टेंबर) रात्री उशिरा पेट्रोल भरण्यावरून वाद होऊन तीन इसमांनी मिळून पेट्रोल पंपावरील कामगार व इतरांवर जीवघेणा हल्ला केला. या घटनेत तिघेजण गंभीर जखमी झाले असून पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.
फिर्यादी स्वप्निल बाळासाहेब नवले (वय ३८, रा. नवले वस्ती, ताथवडे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, रात्री १०.५० वाजता पेट्रोल भरण्यासाठी लाल- काळ्या रंगाच्या पल्सरवरून आलेल्या तीन इसमांना पंपाजवळ सिगारेट पिण्यास मनाई केली. त्याचा राग आल्याने आरोपी सौरभ बंडाळकर (रा. वाकड) याने मोटारसायकलमध्ये पेट्रोल भरणारा कामगार प्रसाद फटाटे याला मुद्दाम धडक दिली.
यानंतर आरोपी व त्याच्या दोन साथीदारांनी (दोघांचे पूर्ण तपशील अद्याप मिळाले नाहीत) फिर्यादी, त्यांचा चुलत भाऊ श्रीधर नवले व कामगार गणेश जगताप यांना लाथाबुक्यांनी मारहाण करून धारदार चाकूंनी वार केले. या हल्ल्यात फिर्यादी व श्रीधर नवले गंभीर जखमी झाले, तर गणेश जगताप याला पाठीत व हातावर चाकूचे वार झाले.
गंभीर स्वरूपाचा हल्ला झाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक मोरे यांनी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून आरोपी सौरभ बंडाळकरला अटक केली असून उर्वरित दोन आरोपींचा शोध सुरू आहे. वाकड पोलिसांनी भारतीय न्याय संहिते अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.













