- कलारंग कला संस्थेचा गुणवंत विद्यार्थी व महिला गौरव सोहळा उत्साहात संपन्न…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ सप्टेंबर २०२५) :- आमदार अमित गोरखे यांच्या मातोश्री आणि माजी नगरसेविका सौ. अनुराधाताई गोरखे यांच्या वाढदिवसानिमित्त कलारंग कला संस्थेच्या वतीने ‘गुणवंत विद्यार्थ्यांचा व महिलांचा गौरव सोहळा’ हा विशेष कार्यक्रम संभाजीनगर येथील साई उद्यानात पार पडला. विद्यार्थी, महिला व पालकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाची सुरुवात प्रा. गणेश शिंदे यांच्या ‘जीवन सुंदर आहे’ या प्रेरणादायी व्याख्यानाने झाली. “प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन काही करण्याची धमक म्हणजे खरे शिक्षण होय,” असे मार्गदर्शन करताना त्यांनी सकारात्मक दृष्टीकोनातून जीवन जगण्याचे महत्त्व पटवून दिले. त्यांच्या प्रभावी विचारांनी उपस्थितांमध्ये उत्साहाची नवी ऊर्जा निर्माण झाली.
यानंतर दहावी व बारावी परीक्षेत यश मिळवलेल्या ४२८ हून अधिक विद्यार्थ्यांचा पारितोषिके व प्रमाणपत्रे देऊन गौरव करण्यात आला. शिक्षणाबद्दल अधिक प्रोत्साहन मिळावे हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले. समाजातील विविध क्षेत्रांत कार्यरत ४६ पेक्षा जास्त महिला बचत गटांच्या प्रतिनिधींनाही सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
या वेळी भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे यांनी प्रभाग क्रमांक १० मधून अनुराधाताई गोरखे या आगामी महापालिका निवडणुकीतील उमेदवार असतील, अशी घोषणा केली. या घोषणेमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
आमदार अमित गोरखे म्हणाले, “हा गौरव सोहळा म्हणजे समाजप्रबोधन, शिक्षण आणि महिला सशक्तीकरण यांचा संगम आहे. गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान त्यांना प्रेरणा देतो, तसेच महिलांचा गौरव करून कलारंग संस्थेने स्त्रीशक्तीचा सन्मान केला आहे.”
माजी नगरसेविका अनुराधा गोरखे यांनी मनोगतात म्हटले, “हा सोहळा म्हणजे समाजातील सकारात्मक बदलाची सुरुवात आहे. विद्यार्थ्यांना व महिलांना प्रोत्साहन देणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. हा सन्मान समाजाच्या प्रेम व विश्वासाचे प्रतीक आहे.”
या कार्यक्रमाला आमदार शंकर जगताप, कामगार नेते इरफान सय्यद, उद्योजक उमेश चांदगुडे, बापू घोलप, तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कलारंग संस्थेच्या या उपक्रमाने सामाजिक बांधिलकीची जाणीव अधिक बळकट झाल्याचे मान्यवरांनी मत व्यक्त केले. कार्यक्रमाचा समारोप आभारप्रदर्शनाने झाला.













