- भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यात शीतयुद्ध?..
- शेतकऱ्यांच्या आडून स्वतःचे राजकीय अस्तित्व वाचवण्याचा प्रयत्न?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी(दि. १५ सप्टेंबर २०२५) :-पुणे जिल्ह्यात पीएमआरडीएने प्रस्तावित केलेल्या नेरे, सांगवडे, दारुंब्रे, साळुंब्रे, गोडुंब्रे आणि धामणे या गावांमधील नगररचना योजना तसेच नेरे-उर्से ६५ मीटर रिंग रोड प्रकल्पाला शेतकऱ्यांकडून तीव्र विरोध होत आहे. या पार्श्वभूमीवर माजी राज्यमंत्री व भाजपचे माजी आमदार बाळा भेगडे यांनी शेतकऱ्यांची बैठक घेऊन आंदोलनाचे नेतृत्व केले. बैठकीला शेकडो शेतकरी उपस्थित होते. भेगडे यांनी प्रकल्पांविरोधात ठाम भूमिका मांडत सांगितले की, “या योजनेमुळे २,१०० एकर बागायती शेती नष्ट होईल. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होईल. म्हणून प्रकल्प रद्द होईपर्यंत हा लढा सुरूच राहील.”
मात्र, भेगडे यांच्या या भूमिकेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. कारण पीएमआरडीएचे पदसिध्द अध्यक्ष हे भाजपचेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. मग भाजपचे माजी राज्यमंत्री आणि माजी आमदार असूनही भेगडे हे थेट मुख्यमंत्र्यांकडे जाऊन चर्चा का करत नाहीत? आपल्या पक्षाने राबवलेल्या प्रकल्पांविरोधात आंदोलन करण्याची त्यांना गरज का भासते? याचा अर्थ मुख्यमंत्री आणि भेगडे यांच्यात काहीतरी बिनसले आहे का?, असा संशय राजकीय वर्तुळात व्यक्त होऊ लागला आहे.
भाजप सरकारचे धोरण समर्थक असल्याने भेगडे यांचा विरोध हा दुटप्पीपणाचाच भाग नाही का? शेतकऱ्यांच्या आडून ते स्वतःचे राजकीय अस्तित्व वाचवण्याचा प्रयत्न करीत आहेत?. पक्षाच्याच प्रकल्पांविरोधात अडथळा आणून स्वतःची ताकद दाखवण्याचा प्रयत्न म्हणजे पक्षविरोधी कृत्यच नाही का? त्यांच्या अशा कृतीमुळे मावळ भाजपमध्येच गोंधळाचे वातावरण तयार होत आहे.











