- भूसंपादन व मोजणी कार्यवाही ऑक्टोबरपर्यंत गतिमान करण्याचे निर्देश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ सप्टेंबर २०२५) :- प्रस्तावित रिंग रोडच्या भूसंपादन प्रक्रियेचा पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी सविस्तर आढावा घेतला. टप्पा एक ते चारमधील सुरू असलेल्या कार्यवाहीची माहिती घेऊन तातडीने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवण्याचे तसेच मोजणी व भूसंपादन प्रक्रिया गतिमान करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
पुणे शहर व परिसरातील वाढत्या वाहतूक कोंडीसाठी रिंग रोड हा महत्त्वाचा पर्याय असल्याचे अधोरेखित करत, आयुक्तांनी टप्पा क्रमांक एकांतर्गत सोलू ते निरगुडी या तीन गावांतील भूसंपादन प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून शेतकऱ्यांना एफएसआय/टीडीआर देण्यासाठी तातडीने बैठक घेण्याचे आदेश दिले.
हिंजवडी व चाकण भागातील वाहतूक कोंडीसह नवले ब्रीज परिसरातील व्यवस्थापनासाठी भूसंपादन, जलवाहिनीचे स्थलांतर आणि सिग्नल यंत्रणा बसविण्याबाबतची सद्यस्थिती जाणून घेतली. संबंधित विभागांनी समन्वयातून ऑक्टोबरपर्यंत ही कामे पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले.
या बैठकीस अतिरिक्त महानगर आयुक्त दीपक सिंगला, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, संचालक अविनाश पाटील, सह आयुक्त हिम्मत खराडे, अधीक्षक अभियंता शिवप्रसाद बागडी, अधीक्षक आशा जाधव तसेच पुणे महानगरपालिका, एनएचएआय, सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग विभाग यांच्यासह विविध वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.











