- टू-व्हीलर टॅक्सी परवानगीविरोधात संताप, बेमुदत बंदीचीही चेतावणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड, (दि. १९ सप्टेंबर २०२५) :- ऑटो टॅक्सी ट्रान्सपोर्ट फेडरेशन व महाराष्ट्र रिक्षा पंचायत संयुक्त कृती समितीच्या वतीने ९ ऑक्टोबर रोजी राज्यव्यापी रिक्षा, टॅक्सी व कॅब बंद आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे. डॉ. बाबा कांबळे, कृती समिती अध्यक्ष नरेंद्र गायकवाड व राष्ट्रीय उपाध्यक्ष आनंद तांबे यांच्या उपस्थितीत पिंपरी येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
महाराष्ट्रात सुमारे २० लाख रिक्षा चालक-मालक आणि ७ लाख टॅक्सी-कॅब चालकांवर टू-व्हीलर टॅक्सीला परवानगी दिल्याने रोजगाराचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. “सरकार नवीन रोजगाराच्या नावाखाली जुने चालक-मालकांना बेरोजगार करत आहे,” असा आरोप डॉ. कांबळे यांनी केला.
मुख्य मागण्यांमध्ये टू-व्हीलर टॅक्सी परवानगी रद्द करणे, मुक्त परवाना बंद करणे, इलेक्ट्रिक रिक्षांना परवान्याच्या कक्षेत आणणे, कल्याणकारी मंडळावर प्रतिनिधींची नियुक्ती व ओला-उबेरसारख्या कंपन्यांचे शोषण थांबवणे या आहेत.
“९ ऑक्टोबरचे आंदोलन हा इशारा आहे. मागण्या न मानल्यास बेमुदत बंद पुकारला जाईल,” असा इशारा डॉ. बाबा कांबळे यांनी दिला.












