- ६५ वर्षीय महिलेची ऑनलाईन १ कोटी रुपयांची फसवणूक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ सप्टेंबर २०२५) :- सायबर गुन्हेगारांनी स्वतःला पोलीस अधिकारी व कुरिअर कंपनीचे प्रतिनिधी असल्याचे भासवून चिंचवड येथील ६५ वर्षीय महिलेची तब्बल १ कोटी रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ३ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी ४.२५ वाजता ते ११ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत ऑनलाईन माध्यमातून ही फसवणूक घडली. आरोपींनी वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरून फिर्यादी महिलेशी संपर्क साधला. स्वतःला “ब्ल्यू डार्ट कुरिअर” चे सुनिल शर्मा, अधिकारी तसेच मुंबई पोलिसातील आयपीएस डीसीपी असल्याचे भासवले. आरोपींपैकी एकाने पोलीस गणवेश परिधान करून व्हिडिओ कॉलदेखील केला.
आरोपींनी महिलेच्या पत्त्यावरून पाठविलेल्या कुरिअर पार्सलमध्ये ड्रग्ज व लॅपटॉप आढळल्याचा बनाव रचून, तिच्या व पतीच्या अटकेची धमकी दिली. त्यानंतर पैसे तपासणीसाठी भरल्यास परत मिळतील, असे सांगून तिचा विश्वास संपादन केला. या धमकीमुळे घाबरलेल्या महिलेकडून आरोपींनी बँक खाते क्रमांक वरून तब्बल १ कोटी रुपये हस्तांतरित करून घेतले.
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने पोलिसांकडे धाव घेतली. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोनि नाळे हे करत आहेत.













