न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ सप्टेंबर २०२५) :- पिंपरी चिंचवडच्या भोसरी परिसरातील एका व्यापाऱ्याला बिटकॉइन व डिजिटल गोल्ड मायनिंगमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून तब्बल १ कोटी ११ लाख ८० हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी तिघांविरुद्ध सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी सुमित सुदाम गव्हाणे (३६, व्यवसाय: व्यापार, रा. भोसरी) यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी ईशा अगरवाल, अक्षया साक्षी व कस्टमर सर्व्हिस यांनी बनावट यूआरएलच्या माध्यमातून बिटकॉइन व डिजिटल गोल्ड मायनिंगमध्ये गुंतवणुकीचा प्रस्ताव दिला. मार्च ते जुलै २०२५ या कालावधीत गव्हाणे यांनी एकूण १.११ कोटी रुपयांची गुंतवणूक केली. आरोपींनी त्यावर तब्बल ७ कोटी रुपयांचा नफा मिळणार असल्याचे दाखवून विश्वास संपादन केला. मात्र, नफा काढण्यासाठी एकूण रकमेच्या २० टक्के शुल्काची मागणी करत गुंतवलेली मूळ रक्कम व नफा परत न करता फिर्यादीची मोठी आर्थिक फसवणूक केली.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोनि नाळे करत आहेत. पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की ऑनलाईन गुंतवणुकीच्या आमिषाला बळी न पडता सत्यता पडताळूनच व्यवहार करावेत, अन्यथा मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते.













