न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मोरेवस्ती (दि. २६ सप्टेंबर २०२५) :- मोरेवस्ती-म्हेत्रेवस्ती भागात भटक्या कुत्र्यांचा त्रास वाढला असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शाळेत जाणाऱ्या मुलांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. रात्री उशिरा घरी परतणाऱ्या नागरिकांवर कुत्र्यांचा हल्ला होण्याची भीती कायम असते. तसेच परिसरात आरोग्यविषयक समस्या निर्माण होत आहेत.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे शहराध्यक्ष विजय जरे यांनी पशुवैद्यकीय अधिकारी अरुण दगडे यांना निवेदन दिले. या प्रसंगी समाजिक कार्यकर्ते सचिन शिंदे व किशोर भंडारी उपस्थित होते.
या निवेदनात भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण आणण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे. कुत्र्यांची संख्या कमी करण्यासाठी कार्यवाही करावी. कुत्रा पकडण्याच्या गाड्यांवर देखरेख ठेवावी. आठवड्यातून किमान तीन वेळा गाडी परिसरात यावी. नागरिकांना सुरक्षित व स्वच्छ वातावरण मिळावे, असे या निवेदनात म्हटले आहे.












