न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ सप्टेंबर २०२५) :- पिंपरी-चिंचवड हद्दीतील चहोली बुद्रुक परिसरात बिबट्याचा वावर पुन्हा एकदा वाढला आहे. बुधवारी (दि.२५) राही कस्तुरी अपार्टमेंटमागील शेतात दोन बिबट्याचे बछडे मुक्तपणे फिरताना दिसल्याने परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत.
गेल्या महिनाभरात या भागात बिबट्याचे अनेक वेळा दर्शन झाले आहे. ७ ऑगस्ट रोजी सुनील काटे यांच्या शेतात, त्यानंतर इंद्रायणी नदी किनारी तसेच एका सोसायटीच्या भिंतीवर बिबट्या दिसल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे शेतकरी, महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक यांची हालचाल मर्यादित झाली आहे. पाळीव जनावरांवर हल्ल्याचेही प्रकार घडल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे.
नागरिकांनी वन विभागाकडे पिंजरा लावून बिबट्याला पकडण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर रात्रीच्या वेळेस गस्त वाढविणे, जनजागृती करणे आणि आवश्यक त्या सूचना देणे या मागण्या सातत्याने पुढे येत आहेत.
या संदर्भात नियतक्षेत्र वन अधिकारी अनिल राठोड यांनी सांगितले की, “बिबट्याला पकडण्यासाठी परवानगी नागपूर येथून मिळावी लागते. सध्या आमचे कर्मचारी परिसरात गस्त घालत आहेत. नागरिकांनी जुने व्हिडिओ किंवा फोटोवर विश्वास ठेवू नये. घाबरून न जाता काळजीपूर्वक वर्तन करावे.”












