न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपळे सौदागर 27 सप्टेंबर 2025) :- उन्नती सोशल फाउंडेशनतर्फे नवरात्रोत्सव २०२५ दरम्यान वेगवेगळ्या रंगानुसार विविध सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत. त्यानुसार पाचव्या दिवशी हिरव्या रंगाच्या अनुषंगाने वृक्षारोपण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा उपक्रम पिंपळे सौदागर येथील लिनिअर गार्डन, गोविंद-यशोदा चौक येथे उत्साहात पार पडला.
या उपक्रमाद्वारे पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासोबतच वनराई वाढविण्याचा संकल्प नागरिकांनी व्यक्त केला. लहान मुले, युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांच्या सहभागामुळे हा उपक्रम अधिकच अर्थपूर्ण ठरला.
या वेळी उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. कुंदाताई संजय भिसे म्हणाल्या, “वृक्षारोपण हा केवळ पर्यावरण संवर्धनाचा उपक्रम नाही, तर समाजातील प्रत्येक नागरिकाला निसर्गाशी जोडणारा संदेश आहे. हिरव्या रंगाच्या माध्यमातून आम्ही नागरिकांना वृक्षपालनाची महत्त्वाची जाणीव करून दिली. प्रत्येक लहान पाऊल, प्रत्येक रोप शुद्ध हवा, निसर्गाची सुगंधी हिरवळ आणि पुढील पिढ्यांसाठी आरोग्यदायी वातावरण घडवते. पुढील वर्षी आम्ही या उपक्रमाला अधिक व्यापक रूप देऊ,” असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमास संस्थापक संजय भिसे, विठाई वाचनालयाचे सदस्य, ऑल सीन सीनियर सिटीजन असोसिएशनचे सदस्य, आनंद हास्य क्लबचे सदस्य, उन्नती सखी मंचाचे कार्यकर्ते आणि उन्नती सोशल फाउंडेशनचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उन्नती सोशल फाउंडेशनने पुढील काळात नवरात्रोत्सवात रंगानुसार आरोग्य, शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि पर्यावरण संवर्धन या विषयांवर विविध सामाजिक उपक्रम राबवण्याचे नियोजन केले आहे.












