न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ सप्टेंबर २०२५) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या “स्वच्छता ही सेवा” अभियानांतर्गत आज पिंपरीत स्वच्छतेचा जागर करण्यात आला. पिंपरी मंडई परिसरासह शगुन चौक, डिलक्स चौक, रेल्वे स्टेशन व साई चौक भागात ही मोहीम पार पडली.
महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या उपस्थितीत ३५० हून अधिक नागरिकांनी स्वच्छतेची शपथ घेत उत्साहाने सहभाग नोंदविला. नागरिकांशी संवाद साधताना आयुक्त सिंह यांनी स्वच्छ सर्वेक्षणात देशात अव्वल क्रमांक मिळविण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचे सांगितले.
या मोहिमेत ७६२ किलो कचरा गोळा करण्यात आला. यावेळी प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर टाळण्याचे आवाहन करण्यात आले व व्यापाऱ्यांना कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमास उपआयुक्त सचिन पवार, क्षेत्रीय अधिकारी निवेदिता घार्गे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, स्वच्छतादूत पवन शर्मा, व्यापारी संघटनेचे पदाधिकारी व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन पवार यांनी केले तर सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.












