- देश–देव–धर्मासाठी युवकांनी मागीतले बळ…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ३ ऑक्टोबर २०२५) श्री शिवप्रतिष्ठान हिन्दूस्थान, पिंपरी-चिंचवड विभागातर्फे आयोजित श्री दुर्गामाता महादौड दसर्यादिवशी उत्साहात पार पडली. छत्रपती शिवाजी महाराज चौक, वाल्हेकरवाडी येथून ही महादौड सुरू होऊन श्रीमान महासाधू मोरया गोसावी मंदिर पटांगण, चिंचवडगाव येथे समारोप झाला. सकाळी ७ ते ९ या वेळेत झालेल्या या भव्य दौडीत हजारो तरुणांनी सहभागी होत देवीकडे देश, देव आणि धर्मासाठी बळ मागितले.
श्री शिवप्रतिष्ठान हिन्दूस्थानतर्फे १९८६ पासून भिडे गुरुजींनी घालून दिलेल्या परंपरेनुसार नवरात्र काळात गावोगावी श्री दुर्गामाता दौड आयोजित केली जाते. पिंपरी-चिंचवड विभागात २००२ पासून हा उपक्रम सुरू असून यंदा २२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ दरम्यान विविध भागात दुर्गामाता दौडी घेण्यात आल्या. त्यानंतर दसर्याच्या दिवशी सर्व दौडींचे एकत्रीकरण करून महादौड काढण्यात आली.
या वेळी युवकांनी “आई भवानी, आम्हाला शक्ती, बुध्दी, शौर्य, धाडस व पराक्रम करण्याची ताकद दे” अशी प्रार्थना केली. महादौडीनंतर शस्त्रपूजनाचा पारंपारिक कार्यक्रमही पार पडला. या उपक्रमामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये धार्मिक आणि सांस्कृतिक वातावरणात सणाचा उत्साह अधिक खुलून आला.











