- भाजपा आमदार महेश लांडगे यांचा समर्थक, पदाधिकारी यांच्या बैठकीत संकल्प…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ३ ऑक्टोबर २०२५) :- मराठवाडा आणि इतर जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या महापुराने शेतकरी-कष्टकरी वर्गाचे प्रचंड नुकसान झाले आहे. ‘‘ओला दुष्काळ’’ भेडसावणाऱ्या या भागातील नागरिकांसाठी पिंपरी-चिंचवडमधून ‘‘एक हात मदतीचा’’ मोहिम राबविण्याचा निर्धार भाजपा आमदार महेश लांडगे यांनी केला आहे.
२०१९ मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील पूरस्थिती आणि कोकणातील चक्रीवादळाच्या काळात महेश लांडगे यांनी याच मोहिमेतून मदतकार्य केले होते. महाराष्ट्रभर कौतुकास्पद ठरलेल्या या उपक्रमाला पुन्हा एकदा नवे बळ मिळाले असून, मराठवाड्यातील ५० गावांतील नागरिकांची दिवाळी गोड करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
यासंदर्भात पिंपरी-चिंचवडमध्ये पदाधिकारी व समर्थकांची बैठक झाली. या बैठकीस माजी महापौर नितीन काळजे, राहुल जाधव, माजी स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, विलास मडिगेरी, नितीन लांडगे, दक्षिण भारत मोर्चा प्रदेशाध्यक्ष राजेश पिल्ले, भाजपा सरचिटणीस विकास डोळस यांच्यासह माजी नगरसेवक व मान्यवर उपस्थित होते.
हिंदुभूषण स्मारक ट्रस्टचा पुढाकार…
‘एक हात मदतीचा’ उपक्रमांतर्गत ३ ते ११ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत मदत संकलन, पॅकिंग आणि वितरण होणार आहे. गुरुवार, दि. ९ ऑक्टोबर रोजी मदतीच्या गाड्यांचे पूजन ‘‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’’ स्मारकाच्या आवारात होणार असून त्या मराठवाड्याकडे रवाना होतील. १० व ११ ऑक्टोबर रोजी पुरग्रस्त भागात मदत पोहोचवली जाईल. यासाठी हिंदुभूषण स्मारक ट्रस्टने नियोजनात पुढाकार घेतला आहे.
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपाने ‘सेवा पंधरवडा’ साजरा केला. त्याच भावनेतून आम्ही ‘एक हात मदतीचा’ उपक्रम राबवत आहोत. जीवनावश्यक वस्तूंचे वितरण, गोधन दान आणि शैक्षणिक मदत अशा तीन टप्प्यांमध्ये मदतकार्य होईल. पिंपरी-चिंचवडकरांनी लोकसहभागातून हातभार लावून एखाद्या पूरग्रस्त कुटुंबाची दिवाळी गोड करावी, असे आवाहन करतो.” – महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड…











