- शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सोहळा संपन्न…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपळे सौदागर (दि. ०३ ऑक्टोबर २०२५) :- पिंपळे सौदागर येथे दसऱ्याच्या पारंपरिक आणि सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडवणारा भव्य ७० फुटी रावण दहन सोहळा प्रचंड उत्साहात पार पडला. शत्रुघ्न काटे युथ फाउंडेशन आणि जयनाथ काटे सोशल फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित या सोहळ्यास हजारो नागरिकांनी उपस्थिती दर्शविली.
या सोहळ्याचे उद्घाटन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. कार्यक्रमाची सुरुवात भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी दिवंगत आमदार स्व. लक्ष्मणभाऊ जगताप यांना स्मरण करून केली. या कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रांत संपर्क प्रमुख मिलिंद देशपांडे, जिल्हा कार्यवाह नरेंद्र पेंडसे, मा. खासदार अमर साबळे, आमदार महेश लांडगे, आमदार शंकर जगताप, आमदार अमित गोरखे, माजी आमदार अश्विनी जगताप, पवना सहकारी बँकेचे चेअरमन जयनाथ काटे यांच्यासह शहरातील आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी, तसेच सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची रंगत वाढवण्यासाठी कुणाल मोरे यांच्या डान्स फ्लोर स्टुडिओच्या ग्रुपने सादर केलेले नृत्य, तसेच हरियाणातील सुनील अनिल तिलकधारी यांनी साकारलेले हनुमान पात्र व त्यांच्या टीमचे महाकाल नृत्य विशेष आकर्षण ठरले. याशिवाय लोकप्रिय गायक अवधूत गांधी, बिग बॉस फेम जान्हवी किल्लेकर, अभिनेत्री मृण्मयी देशपांडे (श्लोक चित्रपट फेम), आणि अभिज्ञा भावे (तारिणी मालिकेतील प्रमुख अभिनेत्री) यांनीही सहभाग नोंदवत कार्यक्रमात रंगत भरली.
रावण दहन हा केवळ परंपरेचा भाग नसून “आपल्या मनातील अहंकार, मत्सर, द्वेष, सामाजिक विषमता आणि व्यसनाधीनता यांचा नाश करून बंधुभाव, एकता आणि विधायकतेचा विजय मिळवण्याचा हा सण आहे”, असा ठाम सामाजिक संदेश मान्यवरांनी दिला. सांस्कृतिक कार्यक्रमांच्या नंतर भव्य ७० फुटी रावणाचा पुतळा दहन करण्यात आला. वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक असलेल्या या क्षणी उपस्थित नागरिकांनी एकच जयघोष करत दसरा सण उत्साहात साजरा केला.
कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल आयोजकांनी पोलीस प्रशासन, वाहतूक विभाग, अग्निशामक दल, पालिका अधिकारी, मान्यवर नागरिक आणि उपस्थित जनसमुदाय यांचे मन:पूर्वक आभार मानले. या यशस्वी आयोजनासाठी शत्रुघ्न काटे युथ फाउंडेशन आणि जयनाथ काटे सोशल फाउंडेशनच्या सर्व सदस्यांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन चेतन अग्रवाल, नीतू अग्रवाल आणि आरजे अक्षय मोरे यांनी करत उपस्थितांचे मन मोहून घेतले.














