- उत्सवात स्पर्धकांकडून बक्षिसांची लयलूट…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिंचवड (दि. दि. ४ ऑक्टोबर २०२५) :- शेखर चिंचवडे युथ फाऊंडेशनतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही शारदीय नवरात्र उत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले होते. नवरात्रातील दांडिया, विविध सांस्कृतिक कार्यक्रम, महिला भगिनींसाठी खास स्पर्धा आणि आकर्षक बक्षिसे यामुळे हा उत्सव नागरिकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. या उत्सवाचा बक्षीस समारंभ शुक्रवार (दि. ३ ऑक्टोबर) चिंचवड विधानसभेचे आमदार व मार्गदर्शक शंकर जगताप यांच्या शुभहस्ते अत्यंत उत्साहात पार पडला.
लोकनेते स्व. लक्ष्मणभाऊ जगताप यांना अभिवादन करीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमास खासदार श्रीरंग बारणे, आमदार शंकर जगताप, आमदार उमाताई खापरे, माजी आमदार अश्विनीताई जगताप, माजी राज्यसभा खासदार अमर साबळे, भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, समीर कुलकर्णी, नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पारंपरिक वेशभूषेत महिलांचा उत्साही सहभाग व दांडियाचा रंगतदार कार्यक्रम यामुळे समारंभ अधिकच रंगला.
बक्षीस वितरण सोहळ्यात प्रथम क्रमांकाच्या विजेत्याला ४० इंची स्मार्ट टीव्ही, द्वितीय क्रमांकाच्या विजेत्याला फ्रिज, तृतीय क्रमांकाच्या विजेत्याला मायक्रोवेव्ह ओव्हन अशी प्रमुख बक्षिसे देण्यात आली. तसेच बेस्ट रीलसाठी ब्रँडेड स्मार्टफोन, मोस्ट व्ह्यूसाठी गिंबल, शिवाय ५० हून अधिक उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आली. उपस्थित सर्व स्पर्धकांना प्रोत्साहनपर भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.
समारंभात बोलताना आमदार शंकर जगताप म्हणाले की, “शेखर चिंचवडे युथ फाऊंडेशनतर्फे नवरात्र उत्सवात घेतलेल्या विविध उपक्रमांमुळे समाजातील सर्व घटक एकत्र येऊन उत्सवात सहभागी होतात. अशा उपक्रमांमुळे सामाजिक बांधिलकी जपली जाते आणि तरुणांना विधायक कार्याची प्रेरणा मिळते. सर्व स्पर्धक, दांडिया रसिक, आयोजक मंडळ आणि विशेषतः महिलांचा सहभाग कौतुकास्पद आहे. येत्या काळात अशा उपक्रमांना मी नेहमीच प्रोत्साहन देत राहीन.”
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शेखर चिंचवडे युथ फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी मोठे परिश्रम घेतले. सर्व पाहुण्यांचे स्वागत, सन्मान आणि बक्षिसांचे वितरण या सोहळ्याचे आकर्षण ठरले.
















