- मिळणार घसघशीत बोनस; आयुक्त शेखर सिंह यांची घोषणा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ ऑक्टोबर २०२५) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या तब्बल साडेसहा हजार कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर दिवाळीपूर्वीच आनंद फुलवणारी बातमी आली आहे. महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी शुक्रवारी (दि. ३) बोनस जाहीर केला. या निर्णयामुळे प्रत्येक कर्मचाऱ्याला महिन्याच्या किमान पगाराएवढा बोनस खात्यात जमा होणार आहे.
या विशेष बोनस योजनेचा लाभ नियमित कर्मचाऱ्यांबरोबरच यंदा सेवानिवृत्त झालेले, राजीनामा दिलेले तसेच स्वेच्छानिवृत्ती घेतलेले अधिकारी व कर्मचारी यांनाही मिळणार आहे. मात्र सहा महिन्यांपेक्षा कमी सेवा झालेल्या नव्या कर्मचाऱ्यांना वगळण्यात आले आहे. मानधनावर काम करणाऱ्यांना महापालिकेकडून २० हजार रुपये बोनस देण्यात येणार आहे.
लेखा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आयुक्त सिंह यांनी यावर्षी साडेआठ टक्के सानुग्रह अनुदानाशिवाय २० हजार रुपयांचा अतिरिक्त बोनस मंजूर केला आहे. त्यामुळे चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांना किमान ४० हजार तर प्रथम श्रेणीतील अधिकाऱ्यांना तब्बल २.५ लाख रुपयांचा बोनस मिळणार आहे.
महापालिका आयुक्तांना स्वतःलाच किमान दोन लाख रुपयांचा बोनस मिळेल. काही ज्येष्ठ डॉक्टरांना त्याहूनही जास्त म्हणजे सुमारे अडीच लाखांपर्यंत लाभ मिळेल. त्यामुळे या बोनस योजनेतून अनेक अधिकारी प्रत्यक्षात ‘लखपती’ होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.














