- खुद्द शहर अभियंत्यांकडूनच कबुली..
- नागरिकांना दिला जातोय सबुरीचा सल्ला…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ ऑक्टोबर २०२५) :- पावसामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील रस्त्यांची अवस्था अधिकच खराब झाली असून अपघातांचा धोका वाढला आहे. “शहरातील रस्त्यांवर तीन हजारांहून अधिक खड्डे असल्याचे सर्वेक्षणात आढळले असून पावसामुळे ही संख्या आता अधिक झाली आहे,” अशी कबुली महापालिकेचे शहर अभियंता मकरंद निकम यांनी दिली.
निकम यांनी सांगितले की, “पाऊस थांबल्यानंतरच खड्ड्यांमध्ये डांबर टाकून दुरुस्ती करता येईल. तोपर्यंत नागरिकांनी रस्त्यावरून जाताना काळजी घ्यावी. अपघात होऊ नयेत यासाठी तात्पुरती उपाययोजना केली जात आहे.”
शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे आतापर्यंत अनेक अपघात झाले असून काहींनी जीव गमावला, तर काहींना अपंगत्व आले आहे. न्यायालयीन सुनावणीत देखील हा मुद्दा वारंवार समोर येत आहे. नुकत्याच मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार खड्ड्यांमुळे अपघात झाल्यास नुकसानभरपाई देण्याची जबाबदारी थेट महापालिका अधिकारी आणि कंत्राटदारांवर टाकण्यात आली आहे. त्यामुळे महापालिकेतील संबंधित विभागातील अधिकाऱ्यांची धाकधूक वाढली आहे.
न्यायालयाच्या आदेशानंतर नागरिकांना खरोखरच नुकसानभरपाई मिळणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, पावसामुळे दिवसेंदिवस वाढणारे खड्डे आणि प्रशासनाची मर्यादित तात्पुरती उपाययोजना यामुळे नागरिकांचा संयम सुटू लागला आहे.














