न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 4 ऑक्टोबर 2025) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या १२८ नगरसेवक जागांसाठीची प्रभागरचना सोमवार (दि. ६) रोजी अंतिम स्वरूपात घोषित होणार आहे. त्यानंतर लगेचच आरक्षणाचा मुद्दा स्पष्ट होणार असल्याने निवडणूक इच्छुकांचे हृदयाचे ठोके वाढले आहेत.
प्रभागांची चार सदस्यीय रचना २२ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झाली होती. त्यावर आलेल्या ३१८ हरकती व सूचनांची सुनावणी १० सप्टेंबर रोजी चिंचवडमधील ऑटो क्लस्टर येथे पार पडली. प्राधिकृत अधिकारी प्रवीण दराडे यांनी त्यानंतर अहवाल नगरविकास विभागाकडे सादर केला. अखेर या प्रक्रियेनंतर सोमवारी अंतिम नकाशा जाहीर होणार आहे.
यंदाची निवडणूक दिवाळीनंतर होणार असल्यामुळे इच्छुकांनी आधीच जनसंपर्काला वेग दिला आहे. नवरात्र, गरबा, दांडिया कार्यक्रमांपासून कोजागिरी पौर्णिमा सोहळ्यापर्यंत प्रत्येक ठिकाणी फ्लेक्स, बॅनर, शुभेच्छा संदेशांचा वर्षाव सुरू आहे. काहींनी तर देवीच्या मंदिरापासून ते परिसरातील सार्वजनिक कार्यक्रमांत आपली उपस्थिती ठळक करण्याचा प्रयत्न केला आहे.
आरक्षणाच्या सोडतीत कोणत्या प्रभागात महिला, ओबीसी, एससी किंवा एसटी आरक्षण पडणार, याची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. नगरसेवकांच्या १२८ जागांपैकी तब्बल ९३ जागा आरक्षित होणार असल्याने अनेकांनी आपल्या राजकीय भवितव्याचा हिशोब सुरू केला आहे. “आपल्या गडावर आरक्षण लागू नये,” अशी प्रार्थना अनेक इच्छुक देवदर्शन, पूजापाठ करून करत आहेत.
दरम्यान, महिला आरक्षणाच्या शक्यतेने काही पुरुष इच्छुकांनी वेगळाच डाव आखला आहे. पत्नीला समांतर उमेदवार म्हणून पुढे आणण्याची मोहीम सुरू झाली आहे. फ्लेक्स, सोशल मीडिया पोस्ट्सवर पत्नीचे छायाचित्र ठळकपणे लावून मतदारांमध्ये तिचा चेहरा परिचित करण्याचे प्रयत्न होत आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत “कौटुंबिक पॉलिटिक्स”ची नवी झलक दिसणार, असे स्पष्ट झाले आहे.















