- अतिरिक्त आयुक्त जांभळे पाटील यांच्याकडे निवडणूक विभाग..
- या अधिकाऱ्यांच्या कामांचीही विभागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ ऑक्टोबर २०२५) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कामकाजाच्या विभागांमध्ये मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. आगामी निवडणुकांचा विचार करून महत्त्वाचा निवडणूक व जनगणना विभाग अतिरिक्त आयुक्त (क्रमांक १) प्रदीप जांभळे पाटील यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. याआधी ही जबाबदारी अतिरिक्त आयुक्त (क्रमांक २) विजयकुमार खोराटे यांच्याकडे होती.
सहायक आयुक्तांच्या जबाबदाऱ्यांमध्येही व्यापक बदल झाले आहेत. सहायक आयुक्त अमित पंडीत यांना आरोग्य कार्यकारी अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार दिला असून, त्यांच्याकडे माहिती व तंत्रज्ञान विभाग कायम ठेवण्यात आला आहे. अश्विनी गायकवाड यांच्याकडे आता ड क्षेत्रीय कार्यालयाची धुरा सोपविण्यात आली आहे, तर ब क्षेत्रीय कार्यालयाची जबाबदारी त्यांच्याकडून काढून घेण्यात आली आहे.
राजाराम सरगर यांच्याकडे आधी असलेले वैद्यकीय मुख्य कार्यालय काढून त्यांना ब क्षेत्रीय कार्यालय सोपविण्यात आले आहे. दरम्यान, दशरथ कांबळे यांना क क्षेत्रीय कार्यालयावरून हलवून झोपडपट्टी निर्मूलन आणि पुनर्वसन विभागाचा कारभार दिला आहे.
समाज विकास विभागाची जबाबदारी परशुराम वाघमोडे यांच्याकडून काढून घेऊन त्यांना आपत्ती व्यवस्थापन आणि अभिलेख कक्ष सांभाळण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. राजीव घुले यांच्याकडे असलेले कर संकलन मुख्य कार्यालय काढून त्यांना स्थानिक संस्था कर (एलबीटी) विभागाची धुरा सोपविण्यात आली आहे.
अविनाश शिंदे यांच्याकडील अभिलेख कक्षाचा अतिरिक्त कार्यभार रद्द करण्यात आला आहे. तसेच, उपायुक्त सीताराम बहुरे यांच्याकडून एलबीटी विभागाचा अतिरिक्त कार्यभारही मागे घेण्यात आला आहे.
या फेरबदलांमुळे महापालिकेतील निवडणूकपूर्व प्रशासकीय हालचालींना वेग आल्याचे स्पष्ट होत आहे.













