- भोसरी मतदारसंघातील वीजपुरवठा होणार अधिक सक्षम…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ ऑक्टोबर २०२५) :- भोसरी विधानसभा मतदारसंघातील वीज पुरवठा सशक्त करण्यासाठी महावितरणने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मोशी उपशाखेचे विभाजन करून बोऱ्हाडेवाडी नवीन उपशाखा स्थापन करण्यास मान्यता मिळाली आहे. यामुळे बोऱ्हाडेवाडी, बारणेवस्ती, गायकवाडवस्ती, नागेश्वरनगर, बोराटेवस्ती, संजय गांधी नगर आणि बनकर वस्ती परिसरातील सुमारे ३० हजार ग्राहकांना अखंड व सुरळीत वीजपुरवठा मिळण्यास मदत होणार आहे.
भोसरी उपविभागीय २ कार्यालयांतर्गत मोशी शाखेत ग्राहकसंख्या वाढल्याने नवीन उपशाखेची गरज निर्माण झाली होती. याआधीच्या शाखेत सुमारे २५ ते ३० हजार ग्राहकांचा भार होता. आमदार महेश लांडगे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर महावितरण प्रशासनाने या प्रस्तावाला मंजुरी दिली.
आमदार लांडगे यांनी सांगितले की, “शहराच्या वाढत्या लोकसंख्या आणि वाढत्या वीज मागणीनुसार वितरण यंत्रणा सक्षम करण्याची आवश्यकता होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सातत्याने पाठपुरावा करत आहोत. आता मंजूर प्रस्तावानुसार महावितरण प्रशासनाने कालबद्ध नियोजन करून कामाला वेग द्यावा,” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.













