न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ ऑक्टोबर २०२५) :- राज्य शासनाच्या निर्णयानुसार अनुकंपा नियुक्ती संदर्भात सुधारित सर्वसमावेशक धोरणाची अंमलबजावणी करण्यात आली असून, शासनाच्या १५० दिवस कार्यक्रमांतर्गत पात्र उमेदवारांना नियुक्ती पत्र आदेश वितरीत करण्याचा राज्यस्तरीय कार्यक्रम मुंबई येथे पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.
पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात दृकश्राव्य प्रणालीद्वारे जिल्ह्यातील पात्र उमेदवारांनाही नियुक्ती आदेश देण्यात आले. यामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या एकूण १९ उमेदवारांचा समावेश होता. त्यात अनुकंपा वारस नियुक्तीअंतर्गत १२ उमेदवारांना आणि लाड समिती शिफारसीनुसार ७ उमेदवारांना नियुक्ती पत्र आदेश देण्यात आले.
मुंबई येथील कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह प्रमुख मान्यवर उपस्थित होते. तर पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी गजानन पाटील आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सहआयुक्त मनोज लोणकर यांनी उपस्थित राहून उमेदवारांचे स्वागत केले.
नियुक्ती आदेश प्राप्त करणाऱ्यांमध्ये लिपिक पदासाठी अभिजित जाधव, समीक्षा इंदुलकर, सुशांत फलके, व्यंकटेश गोणे, शिपाई पदासाठी दीपक नवले, साहिल काशिद, नयना हुंबरे, संकेत यादव, मजूर पदासाठी गणेश पडवळ, प्रीतम कडलग, स्पे कुली पदासाठी मनीष लोहारे, अमृत कांबळे, तर सफाई कामगार पदासाठी रोहन लोंढे, अर्चना पाथरकर, विशाल वाघमारे, श्रीदेवी गायकवाड, अजिंक्य काळोखे, प्रवीण पोटे आणि अभिषेक केदारी यांचा समावेश आहे.
या नियुक्त्यांमुळे अनेक कुटुंबांना आधार मिळणार असून, शासनाच्या निर्णयामुळे सामाजिक न्यायाची अंमलबजावणी होत असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.













