- कल्पतरू चौक सबवे, डांगे चौक विस्तार, डेअरी फार्म भुयारी मार्ग यांसह निधीवाढीवर प्रश्नचिन्ह?..
- अचानकपणे वाढीव तरतुदीचा नेमका फायदा कोणाला?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी | सोमवार, ६ ऑक्टोबर २०२५ :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात अनेक मोठ्या प्रकल्पांसाठीच्या निधीमध्ये अचानक वाढ करण्यात आल्याने नागरिक आणि विरोधकांकडून संशय व्यक्त केला जात आहे. या निधीवाढीचा नेमका फायदा कोणाला होणार? याबाबत सवाल उपस्थित केला जात आहे.
वाकड ते नाशिक फाटा बीआरटी मार्गावरील कल्पतरू सोसायटी चौकात सबवे बांधकामासाठी आधी ३० कोटी रुपयांची तरतूद होती. मात्र, अचानक ती वाढवून ३५ कोटी करण्यात आली आहे. आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी या वाढीला प्रशासकीय मान्यता दिल्याने प्रशासनावर निवडक ठेकेदारांना लाभ देण्याचा प्रयत्न होत असल्याची टिका सुरू झाल्याची माहिती मिळतेय.
फक्त कल्पतरू चौकच नाही, तर पीके चौक, डांगे चौक, फुगेवाडी भुयारी मार्ग आणि आयटीआय बांधकाम अशा अनेक प्रकल्पांच्या निधीमध्ये अचानक मोठी वाढ करण्यात आली आहे.
- पीके चौक सिग्नल फ्री करण्यासाठीचा खर्च ३० कोटींवरून ४५ कोटींवर
- डांगे चौक ग्रेडसेपरेटर वाढविण्यासाठीचा खर्च २८ कोटींवरून ५० कोटींवर
- फुगेवाडी भुयारी मार्गासाठी २० कोटींवरून ३० कोटींवर
- आयटीआय बांधकामासाठी १०० कोटींवरून १२० कोटींवर
- डेअरी फार्म भुयारी मार्गासाठी ४० लाखांवरून थेट ४० कोटींपर्यंत वाढ करण्यात आली आहे.
शहरी दळणवळण विभागाच्या प्रकल्पांमध्ये पूर्वीही नियोजनाअभावी तक्रारी झालेल्या आहेत. महापालिका नेहमीच आवश्यक नसलेल्या ठिकाणी प्रकल्प उभे करते, पण गरज असलेल्या भागाकडे दुर्लक्ष करते. अचानक झालेल्या निधीवाढीमुळे ठेकेदारांचा फायदा होतो, नागरिकांचा नाही.
इतक्या मोठ्या प्रमाणावर निधीवाढ का करण्यात आली, या वाढीमागे कोणाचा दबाव आहे का आणि या निर्णयांचा फायदा नेमका कोणाला होणार?, अशी कुजबूज पालिका आवारात सुरू आहे. अचानक झालेल्या निधीवाढीवर नागरिकांकडून आणि काही सामाजिक संघटनांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. या निधीवाढीची चौकशी करण्याची मागणी पुढे येण्याची शक्यता आहे.













