- दिव्यांग सर्वेक्षणासाठी ठेकेदाराला दोन कोटींचा मोबदला..
- आशा स्वयंसेविकांची किरकोळ रकमेवर बोळवण?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी | सोमवार, ६ ऑक्टोबर २०२५ :- पिंपरी चिंचवड महापालिका आणि दिव्यांग भवन यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील दिव्यांग नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या कामासाठी मे. महात्मा गांधी सेवा संघ, औरंगाबाद या ठेकेदार संस्थेची निवड करण्यात आली असून, या संस्थेला तब्बल दोन कोटी रुपये मिळणार आहेत. विशेष म्हणजे या कामाची जबाबदारी शहरातील ज्या आशा सेविकांच्या खांद्यावर देण्यात येणार आहे. त्यांना या कामाच्या मोबदल्यापोटी फक्त पंचवीस रूपये महापालिका देणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.
दरम्यान महापालिकेकडे आधीच दिव्यांग नागरिकांची माहिती असताना पुन्हा एकदा ठेकेदारी पद्धतीने सर्वेक्षणाचा घाट का घातला जातोय हा मुख्य प्रश्न उपस्थित झाला आहे. या सर्वेक्षणासाठी १४ जानेवारी २०२५ रोजी निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती. दोन कंपन्या सहभागी झाल्या असल्या तरी त्यापैकी एक अपात्र ठरवून उर्वरित संस्थेला काम देण्यात आले.
ठेकेदाराकडून सुरुवातीला प्रति दिव्यांग १८० रुपये असा दर देण्यात आला होता, जो नंतर कमी करून १३६ रुपये प्रति दिव्यांग करण्यात आला. शहरात अंदाजे १.५ लाख दिव्यांग व्यक्ती असल्याने या कामाचा एकूण खर्च २ कोटी ४ लाख रुपये एवढा ठरविण्यात आला आहे.
हे काम सामाजिक उद्देशाने केले जात आहे. मात्र, प्रत्यक्षात काम करणाऱ्या आशा सेविकांना फक्त पाच ते पंचवीस रुपये प्रति घर एवढाच मोबदला दिला जाणार आहे. म्हणजेच ठेकेदार संस्था कोट्यवधी रुपये मिळवणार आणि काम करणाऱ्या महिलांना तुटपुंजे मानधन देण्यात येणार, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. दिव्यांग सर्वेक्षणाच्या नावाखाली ठेकेदारांना लाभ देण्याचा हा प्रकार आहे, अशी सर्वत्र ओरड होत आहे.













