- चाकण दक्षिण आणि उत्तर महाळुंगे एमआयडीसीत नवी दोन पोलिस ठाणी स्थापन होणार..
- नव्या ठाण्यांसह तीन उपायुक्त व सहा सहायक आयुक्त पदांना मंजुरी..
- चौथ्या परिमंडळाच्या निर्मितीची तयारी सुरू…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १६ ऑक्टोबर २०२५) :- पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात वाढत्या औद्योगिक विस्तारामुळे सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. चाकण दक्षिण आणि उत्तर महाळुंगे एमआयडीसी भागात दोन नवीन पोलिस ठाण्यांच्या स्थापनेला शासनाच्या उच्चस्तरीय समितीने मान्यता दिली आहे. त्यामुळे या औद्योगिक पट्ट्यातील कायदा आणि सुव्यवस्था अधिक सक्षम होणार आहे.
यासोबतच तीन नवीन उपायुक्त आणि सहा सहायक आयुक्त पदांच्या प्रस्तावांनाही अंतिम मान्यता मिळाली आहे. त्यामुळे पोलिस आयुक्तालयात आता एकूण आठ उपायुक्त आणि १९ सहायक आयुक्त (त्यात एक वायरलेस विभागाचे) पदे उपलब्ध होणार आहेत.
सध्या आयुक्तालयात तीन परिमंडळांतर्गत २२ पोलिस ठाण्यांचे कार्य चालते. नव्या दोन ठाण्यांच्या स्थापनेनंतर ही संख्या २४ होणार असून, चौथ्या परिमंडळाची निर्मिती करण्याची तयारी सुरू आहे.
या निर्णयामुळे औद्योगिक क्षेत्रातील गुन्हेगारी नियंत्रण, वाहतूक व्यवस्थापन आणि नागरिक सुरक्षेसाठी अधिक प्रभावी यंत्रणा कार्यरत राहणार आहे, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.













