न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १६ ऑक्टोबर २०२५) :- दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना शहरातील अनेक भागांत बेकायदेशीर फटाका स्टॉल उभारले गेले आहेत. पदपथांवरील अतिक्रमण, वाहतूक कोंडी आणि आगीचा धोका लक्षात घेता महापालिकेने यावर्षी कडक धोरण राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
अग्निशमन विभागाच्या माहितीनुसार, परवानगीशिवाय उभारलेल्या स्टॉलवर कारवाई करण्यात येणार आहे. अधिकृत परवानगी घेण्यासाठी स्टॉलधारकांना ₹२,२०० शुल्क आकारले जात आहे.
अग्निशमन विभागाचे सहाय्यक आयुक्त उमेश ढाकणे यांनी सांगितले की, “स्टॉल परिसरात वाळू आणि पाण्याची व्यवस्था ठेवावी, धूम्रपानास सक्त मनाई करावी आणि लहान मुलांना फटाक्यांपासून दूर ठेवावे.”
शहरातील आठही क्षेत्रीय कार्यालयांमार्फत परवानगी प्रक्रिया सुरू असून, परवानगीशिवाय उभारलेले फटाका स्टॉल अतिक्रमण मानून तातडीने हटविण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.













