- तातडीने दुरुस्ती व डांबरीकरणाची मागणी..
- अनिताताई संदीप काटे यांचे पिंपरी चिंचवड महापालिकेस निवेदन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपळे सौदागर (दि. १६ ऑक्टोबर २०२५) :- पिंपळे सौदागर परिसरातील विश्वशांती कॉलनी येथील रस्त्यांची दुरवस्था गेल्या काही महिन्यांपासून गंभीर स्वरूपात वाढत असून, नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. खोल खड्डे, उखडलेले डांबर आणि निचऱ्याच्या अभावामुळे या भागातील वाहतूक धोकादायक बनली आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्या अनिताताई संदीप काटे यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ‘ड क्षेत्रीय’ कार्यालयाच्या स्थापत्य विभागाकडे लेखी निवेदन देत तातडीने दुरुस्ती आणि दर्जेदार रस्ता उभारण्याची मागणी केली आहे.
अनिताताई काटे यांनी निवेदनात म्हटले आहे की, विश्वशांती कॉलनी परिसरात वाहनचालकांना खड्ड्यांमुळे अपघातांचा धोका निर्माण होत आहे. विशेषतः शाळा आणि कार्यालयांत जाणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. कॉलनीतील अंतर्गत रस्त्यांवरील उखडलेल्या डांबरामुळे वाहनांचे नुकसान होत असून, पावसाळ्यात साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांना चालणे कठीण झाले आहे.
रस्त्यांची ही अवस्था दीर्घकाळ दुर्लक्षित राहिल्यामुळे वाहतुकीची परिस्थिती बिकट झाली आहे. अनेक वाहन चालक आणि दुचाकीस्वार घसरून अपघातग्रस्त झाले आहेत. त्यामुळे महानगरपालिकेने तातडीने या रस्त्यांची पाहणी करून कामास मंजुरी देऊन दुरुस्ती करावी, असे या निवेदनात अनिताताई संदीप काटे यांनी म्हटले आहे.
महानगरपालिकेच्या स्थापत्य विभागाकडून या प्रकरणाची तातडीने पाहणी करीत कामास प्रत्यक्ष सुरुवात केली जाईल, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. येथील रहिवाशांनी अनिताताई काटे यांच्या पुढाकाराचे स्वागत केले असून, महापालिकेने जनतेच्या अडचणी गांभीर्याने घ्याव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे.
विश्वशांती कॉलनी परिसरातील वरील भागात आम्ही पावसाळ्यात “एमपीएम” वापरून रस्ते दुरुस्ती केलेली आहे. खालच्या भागात डांबरीकरण करण्यात येणार आहे. पावसाळ्यानंतर आताच प्लांट सुरू झालेले आहेत. दिवाळीनंतर प्रत्यक्ष कामकाजाला सुरूवात होईल.
– सुनिल शिंदे, कार्यकारी अभियंता – स्थापत्य विभाग ‘ड’ प्रभाग…













