- ताम्हाणे वस्ती चिखलीत जोडल्याने राष्ट्रवादीचे गणित बिघडले..
- फोडाफोडीमुळे राजकीय वातावरण तापलं…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १७ ऑक्टोबर २०२५) :- महापालिकेच्या नव्या प्रभाग रचनेनंतर तळवडे प्रभाग क्रमांक १२ मधील ताम्हाणे वस्ती चिखली गावठाण प्रभाग क्रमांक १ मध्ये जोडल्यामुळे स्थानिक राजकारणात चांगलीच खळबळ माजली आहे.
सुमारे सहा ते सात हजार मतदारांचा समावेश चिखलीत झाल्याने तळवडे प्रभागातील मतसंख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा मजबूत पॅनेल डळमळीत करण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून झाल्याची चर्चा सुरू आहे.
या बदलामुळे तळवडे प्रभागाची लोकसंख्या जवळपास आठ हजारांनी घटून ४९ हजारांवर आली आहे, तर चिखली प्रभागातील लोकसंख्या तब्बल ६५ हजारांवर गेली आहे. यामुळे शहरातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला प्रभाग म्हणून चिखलीची नोंद झाली आहे.
राजकीय वर्तुळात भाजपाने रणनीतीपूर्वक ही फोडणी केली असल्याचे म्हटले जात असून, राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका संगीता ताम्हाणे यांच्या मतदारवर्गावर थेट परिणाम झाला आहे. आगामी महापालिका निवडणुकीत या फेररचनेचा फायदा कोणाला होतो आणि तोटा कोणाला, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.













