- राजकीय समीकरणे ढवळली; ‘सौभाग्यवतींच्या’ ब्रँडींग’ची तयारी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहूगाव (दि. १७ ऑक्टोबर २०२५) :- राज्य निवडणूक आयोगाने देहू नगरपंचायतीसाठी नगराध्यक्षपद खुल्या (महिला) प्रवर्गासाठी राखीव ठरविल्याची घोषणा होताच देहूगावातील राजकारणात नवीन घडामोडी घडू लागल्या आहेत. पुरुष इच्छुकांची समीकरणे पूर्णपणे बदलली असून, अनेकांनी आपल्या पत्नींना निवडणूक रिंगणात उतरविण्याची तयारी सुरू केली आहे.
२०२२ मध्ये अनुसूचित जाती (महिला) प्रवर्गासाठी राखीव असलेले नगराध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्मिता चव्हाण यांच्या वाट्याला आले होते. त्या देहू नगरपंचायतीच्या पहिल्या नगराध्यक्षा ठरल्या होत्या. यावेळी पुन्हा महिला आरक्षण लागू झाल्याने नगराध्यक्षपदासाठी महिलांमध्ये चुरस निर्माण झाली आहे.
गेल्या काही महिन्यांत विद्यमान नगरसेवकांनी सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून मतदारसंघात आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, आता महिलांसाठी आरक्षण लागू झाल्याने अनेकांचे गणित बिघडले आहे.
विद्यमान नगरसेवकांच्या पत्नींसह नवे चेहरेही पुढे येत असून, देहू नगरपंचायतीच्या निवडणुकीत “सौभाग्यवतींची” रस्सीखेच रंगणार आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस आपला गड टिकवते की भाजप नवा झेंडा फडकवते, हे आगामी निवडणुकीत स्पष्ट होणार आहे.











