न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ ऑक्टोबर २०२५) :- पिंपरी चिंचवड महापालिकेने सौर ऊर्जेचा प्रभावी वापर करून तब्बल ५ कोटी ९१ लाख रुपयांची वीजबिलात बचत केली आहे.
महापालिकेच्या ८६ इमारतींवर सौर पॅनेल्स बसवण्यात आले असून, या यंत्रणांद्वारे प्रतितास ३ मेगावॅट क्षमतेची वीज निर्मिती होते. सप्टेंबर २०२५ अखेर ५९ लाख १७ हजार ११२ युनिट्स वीज तयार झाली आहे.
मुख्य प्रशासकीय इमारत, शाळा, स्मशानभूमी, जलतरण तलाव, नाट्यगृह, रुग्णालये आदी ठिकाणी ही प्रणाली कार्यान्वित आहे. या माध्यमातून आर्थिक बचतीसोबतच पर्यावरणपूरक ऊर्जेकडे वाटचाल गतीमान झाली आहे.
भविष्यातील ऊर्जेच्या गरजा लक्षात घेऊन महापालिकेने आणखी १३ ठिकाणी ४५० किलोवॅट क्षमतेच्या सौर प्रकल्पांचे काम सुरू केले असून, ५८ ठिकाणी ४ मेगावॅट क्षमतेची नवीन यंत्रणा उभारण्याचे नियोजन आहे. या उपक्रमातून शहराच्या ‘नेट झिरो’ उद्दिष्टाकडे महत्त्वपूर्ण पाऊल टाकले जाईल.













