न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि.१ जून २०१९) :- प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक आणि सिल्व्हर ग्रुपचे संचालक संतोष बारणे यांना अण्णासाहेब मगर सोशल / स्पोर्टस फाऊंडेशनचा पिंपरी-चिंचवड भूषण पुरस्कार जाहिर झाला आहे. त्यांच्या उल्लेखणीय कार्याबद्दल त्यांना या पुरस्काराने सन्मानित कऱण्यात येणार आहे.
पिंपरी-चिंचवड शहरामध्ये मोठ-मोठे प्रकल्प साकारून मागील पाच वर्षात तीन हजार घरे उपलब्ध करून देण्याचा मानस त्यांनी पूर्ण केला आहे. तसेच पाच टक्के लोकांना ना नफा ना तोटा या तत्वावर घरे दिली आहेत. तसेच बांधकाम क्षेत्रासह शैक्षणिक, सामाजिक, हॉटेल, धार्मिक आणि क्रीडा क्षेत्रातही त्यांची उत्कृष्ट कामगिरी आहे. मागील काही महिन्यांपूर्वी संतोष बारणे यांची अँम्युचर स्पोर्टस किक बॉक्सिंग असोसिएशनच्या (महाराष्ट्र राज्य) संघटनेच्या चेअरमन पदी निवड करण्यात आली आहे. त्यानंतर बालेवाडी येथे त्यांनी उत्कृष्टरित्या स्पर्धाही आयोजित करून यशस्वी केल्या आहेत. त्यांच्या या कार्याचा आढावा घेऊन अण्णासाहेब मगर सोशल फाऊंडेशनने त्यांना पिंपरी-चिंचवड भूषण पुरस्कार जाहिर केला आहे.
या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन १६ जून रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. यावेळी सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांच्या हस्ते या पुरस्कार सोहळ्याचे वितरण होणार असल्याची माहिती फाऊंडेशनचे अध्यक्ष गुलाब बिरदवडे यांनी दिली.















