न्यूज पीसीएमसी नेटवर्क
लोणावळा (दि.१ जून २०१९) :- लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात शिवसेनेला भरघोस यश देणारी कुलस्वामिनी आई एकविरा देवीच्या चरणी नतमस्तक होण्याकरिता आज शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, रश्मी ठाकरे व युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे आले होते.
लोकसभेच्या निवडणुकीच्यापूर्वी उध्दव ठाकरे कार्ला गडावरील कुलस्वामिनी एकविरा देवीच्या दर्शनाला आले होते. महाराष्ट्रात शिवसेनेला भरघोस यश मिळू दे असे साकडे ही त्यांनी त्यावेळी देवीला घातले होते. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या २५ पैकी १८ खासदारांनी भरघोस यश मिळविले. या विजयाचा आनंद व देवीला घातलेले साकडे फेडण्याकरिता उध्दव ठाकरे आज सर्व विजयी खासदारांना घेऊन गडावर आले होते. गडावर देवीची विधिवत पुजा करत देवीची ओटी रश्मी ठाकरे यांनी भरली. यानंतर देवीची आरती करण्यात आली.

नव्यानेच शिवसेनेचे मंत्री झालेले अरविंद सावंत, खासदार श्रीरंग बारणे, श्रीकांत शिंदे, गजानन किर्तीकर, राजन विचारे, भावना गवळी, राहुल शेवाळे, विनायक राऊत, धैर्यशील माने, संजय मंडलीक, हेमंत गोडसे, कृपाल तुमाणे, प्रतापराव जाधव, सदाशिव लोखंडे, संजय जाधव, राजेंद्र गावित, ओमराजे निंबाळकर, हेमंत पाटील यांच्यासह एकविरा देवस्थान ट्रस्टचे माजी अध्यक्ष अनंत तरे, भारतीय कामगार सेना महासंघाचे उपाध्यक्ष इरफानभाई सय्यद, पुणे जिल्हा प्रमुख गजानन चिंचवडे, तालुकाप्रमुख राजू खांडभोर, लोणावळ्याच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव, माजी पुणे जिल्हाप्रमुख मच्छिंद्र खराडे, तालुका संघटक शरद हुलावळे, सुरेश गायकवाड, अंकूश देशमुख, श्रीधर पुजारी यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भोसरी विधानसभेची जागा शिवसेनेकडे खेचण्याकरीता शिवसेनेची वरिष्ठ पातळीवर रस्सीखेच सुरु आहे.शिरूर लोकसभेचा पराभव पक्षनेते उद्धव ठाकरे यांना काही रुचला नाही. हक्काच्या जागी पराभव पत्करावा लागल्यामुळे उद्धव ठाकरे या पराभवाचा वचपा काढण्याच्या प्रयत्नात असल्याचे वरिष्ठ पातळीवरून समजते. या चढाओढीत भोसरीची जागा शिवसेनेला मिळाल्यास त्या ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार कोण? याबाबतही चाचपणी सुरु आहे. आज एकविरा गडावर ठाकरे दांपत्याबरोबरच शिवसेनेचे खासदार व नेतेमंडळीही आली होती. यादरम्यान कामगारांचे नेते इरफान सय्यद हेही यावेळी उपस्थित होते. याप्रसंगी खा. विनायक राऊत यांनी इरफान सय्यद यांना भोसरी विधानसभेचे काम सुरु करण्याच्या सूचना दिल्याचे अधिकृत सूत्रांकडून समजते.
असंघटित, माथाडी कामगारांना रोजगार पुरवून त्यांच्या आयुष्यात अमुलाग्र बदल घडवून आणण्याचे काम कामगार नेते इरफान सय्यद यांनी केले आहे. त्यांच्या कामाची दखल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतली असल्याची माहितीही सूत्रांनी दिली.











