- वडमुखवाडीतील फॉर्च्युनरमधील गोळीबारात युवक ठार..
- मावळात प्रेमसंबंधाच्या वादातून तरूणावर गोळीबार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १३ नोव्हेंबर २०२५) :- पिंपरी-चिंचवड शहर आणि मावळ परिसरांत दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या शूटआऊट घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दिघी आणि मावळ परिसरात झालेल्या या दोन गंभीर घटनांमध्ये एका युवकाचा खून झाला असून दुसरा गंभीर जखमी झाला आहे. दोन्ही प्रकरणांमध्ये पोलीसांनी गुन्हे दाखल केले असून आरोपींवर कठोर कलमांखाली कारवाई करण्यात आली आहे.
पहिल्या घटनेत १२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.३० च्या सुमारास वडमुखवाडी, च-होली बु।। परिसरातील खडी मशीन रोडजवळ नितीन गिलबिले (वय ३८) याला आरोपी अमित जीवन पठारे आणि विक्रांत ठाकूर यांनी फॉर्च्युनर गाडीत बसवले. काही काळानंतर त्याच्या डोक्यात गोळी झाडून पूर्वनियोजित कट रचून त्याची हत्या केली. या प्रकरणी सचिन गिलबिले यांच्या फिर्यादीवरून दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. आरोपींपैकी एकाला अटक झाली असून दुसरा फरार आहे.
दुसऱ्या घटनेत नोव्हेंबर रोजी रात्री १०.३० वाजता मावळ तालुक्यातील ओझर्डे गावाजवळ, मुंबई–पुणे एक्स्प्रेसवे लगतच्या कच्च्या रस्त्यावर विकास केदारी (३१) याच्यावर पिस्तूलसदृश हत्याराने गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला. फिर्यादी किरण केदारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अभिजीत आणि नितीन केदारी यांनी विकास आणि आरोपींची बहिण यांच्यातील प्रेमसंबंधामुळे हा हल्ला केल्याचा संशय व्यक्त केला आहे.
दोन्ही प्रकरणांची तपास पोलीस निरीक्षक वाघ आणि पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, आरोपींवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे पोलीसांकडून सांगण्यात आले आहे.












