न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ नोव्हेंबर २०२५) :- उन्नती सोशल फाऊंडेशनच्या उन्नती सखी मंच तर्फे आणि टीम शोभा यांच्या सौजन्याने आयोजित ‘फिटनेस फिएस्टा फॉर किड्स’ हा उपक्रम पिंपळे सौदागर येथील लिनीयर गार्डनमध्ये उत्साहात पार पडला. चिल्ड्रेन्स डेच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला पालक, शिक्षक आणि बालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ८:०० वाजता ऊर्जादायी वॉर्म-अप सेशनने झाली. मुलांसह पालकांनीही आनंदाने सहभागी होत विविध फिटनेस उपक्रमांमध्ये मनमोकळा सहभाग नोंदवला. “पालक विरुद्ध मुले”, “शिक्षक विरुद्ध मुले” आणि “मुलांमधील फिटनेस स्पर्धा” अशा रोमहर्षक राऊंड्समुळे कार्यक्रमात चैतन्य मिसळले. नृत्य, योग, हलके-फुलके व्यायाम आणि टीम गेम्सच्या माध्यमातून मुलांनी आनंदाने फिटनेसचा अनुभव घेतला.
या उपक्रमाबाबत उन्नती सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ. कुंदाताई संजय भिसे म्हणाल्या, “उन्नती सखीच्या माध्यमातून आम्ही महिलांबरोबरच मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करतो. मुलांमध्ये आत्मविश्वास, आरोग्य आणि समूहभाव वाढवण्यासाठी असे उपक्रम अत्यंत महत्त्वाचे आहेत. चिल्ड्रेन्स डेच्या निमित्ताने मुलांनी आणि पालकांनी इतक्या उत्साहाने सहभाग घेतल्याने आमचे प्रयत्न अधिक सार्थक झाले. पुढील काळातही अशा उपक्रमांचे आयोजन सातत्याने करण्यात येईल.”
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी टीम शोभा, उन्नती सखी मंचचे स्वयंसेवक आणि उन्नती सोशल फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. विनामूल्य नोंदणी असलेल्या या कार्यक्रमाला शेकडो पालक आणि मुलांचा उत्स्फूर्त सहभाग मिळाल्याने कार्यक्रम यशस्वी झाला.
याप्रसंगी उन्नती सोशल फाऊंडेशनचे संस्थापक संजय भिसे यांच्यासह उन्नती सखी मंचच्या सभासद, विठाई वाचनालयचे सभासद, आनंद हास्य क्लबचे सभासद, ऑल सिनियर सिटीजन्स असोसिएशनचे सर्व सभासद, लिनिअर गार्डन जेष्ठ नागरिक संघाचे सदस्य, पिंपळे सौदागर, रहाटणी परिसरातील स्पर्धक, नागरिक बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.











