- आयुक्त बदल व प्रशासकीय विलंबामुळे पदोन्नतीचा निर्णय ठप्प…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २० नोव्हेंबर २०२५) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेत गेल्या काही आठवड्यांपासून २५ संवर्गांतील तब्बल ५० पदोन्नत्या रखडल्याने अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. तत्कालीन आयुक्त शेखर सिंह यांच्या अचानक झालेल्या बदल्यामुळे या प्रक्रिया थांबल्या असून, अनेक कर्मचारी प्रमोशनच्या प्रतिक्षेत आहेत.
शेखर सिंह यांची ७ ऑक्टोबर रोजी बदली झाल्याने आधीच बैठकीपर्यंत पोहोचलेल्या पदोन्नती प्रक्रियेला अचानक ‘ब्रेक’ लागला. महापालिकेतील दोन सहशहर अभियंते, दोन कार्यकारी अभियंते, एक सहआयुक्त तसेच विविध विभागांमधील वरिष्ठ कर्मचाऱ्यांची सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती निश्चित होती. पदोन्नती समितीची बैठकही झाली होती; मात्र अंतिम सही प्रक्रियेपूर्वीच आयुक्त बदलल्याने निर्णय ठप्प झाला.
प्रभारी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे महापालिकेचा अतिरिक्त कार्यभार असला तरी बिहार विधानसभा निवडणुकीसाठी ते निरीक्षक म्हणून गेल्याने समितीची बैठक घेता आली नाही. आता ते पुन्हा कार्यभार संभाळत असल्याने अडकलेल्या पदोन्नतींना वेग मिळेल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, “विलंबामुळे आमचे नुकसान होत आहे; त्वरित प्रमोशन दिले जावे,” अशी मागणी कर्मचारी सातत्याने करत आहेत. महापालिकेत अडकलेल्या पदोन्नती प्रक्रियेचा लवकर निकाल लागणे गरजेचे असल्याची भावना कर्मचारीवर्गातून व्यक्त होत आहे.












