- २४ नोव्हेंबरपर्यंत हरकती दाखल करण्याची मुदत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २० नोव्हेंबर २०२५) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेने दुरुस्तीसह सुधारित आरक्षण सोडत सोमवारी (दि. १७) जाहीर केली. त्यानंतर केवळ तीन दिवसांत तब्बल २२ हरकती प्राप्त झाल्या असून, आगामी निवडणूक प्रक्रियेबाबत नागरिक, संभाव्य उमेदवार आणि राजकीय पक्षांमध्ये मोठी हालचाल सुरू झाल्याचे चित्र आहे.
महापालिकेने प्रथम ११ नोव्हेंबरला आरक्षण सोडत प्रसिद्ध केली होती. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाच्या दुरुस्तीनुसार सुधारित यादी सोमवारी (दि. १७) जाहीर करण्यात आली. पहिल्या दिवशी एकही हरकत आली नाही. मात्र मंगळवारी (दि. १८) चार तर बुधवारी (दि. १९) तब्बल १८ हरकती दाखल झाल्या. त्यामुळे हरकतींची एकूण संख्या २२ वर पोहोचली आहे.
हरकती आणि सूचनांचा स्वीकार महापालिका भवनाच्या तळमजल्यावरील निवडणूक विभागात तसेच सर्व आठ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये सुरू असून, नागरिकांना सोमवार (दि. २४) पर्यंत आपले म्हणणे नोंदवण्याची संधी उपलब्ध आहे. आरक्षणाबाबत वाढत्या हरकतींमुळे पुढील काही दिवसांत या प्रक्रियेला अधिक वेग येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.












