न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २७ नोव्हेंबर २०२५) :- चऱ्होलीतील वडमुखवाडी येथे व्यावसायिक नितीन गिलबिले यांची गोळी झाडून हत्या करणाऱ्या टोळीतील तिघांना अटक झाल्यानंतर या प्रकरणाने धक्कादायक कलाटणी घेतली आहे. या खुनात सहभागी म्हणून माजी नगरसेवक किसन महाराज तापकीर यांचे नाव समोर आले असून, दिघी पोलिसांनी त्यांचा आरोपींमध्ये औपचारिक समावेश केला आहे. तापकीर यांच्या भूमिकेबाबत अधिक तपास सुरू असून, प्रकरणाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
खून झालेला व्यावसायिक नितीन शंकर गिलबिले (वय ३७, रा. वडमुखवाडी) असून, या गुन्ह्यात अमित जीवन पठारे (३५), विक्रांत सुरेश ठाकूर आणि सुमित फुलचंद पटेल (३१) या तिघांना अटक करण्यात आली आहे.
घटनेचा तपशील…
१२ नोव्हेंबरच्या संध्याकाळी अलंकापूरम रस्त्यावर गिलबिले आणि त्यांचे परिचित उभे असताना आरोपी अमित पठारे आणि विक्रांत ठाकूर फॉर्च्यूनर कारने तेथे आले. दोघांनी गिलबिले यांना कारमध्ये बसवून डोक्यात जवळून गोळी झाडली. गिलबिले जागीच ठार झाले व आरोपी पसार झाले.
ताम्हिणी घाट परिसरात आरोपी लपल्याची माहिती मिळताच पोलिसांनी शोधमोहीम केली. विना नंबर प्लेटची संशयित मोटार दिसल्याने तिचा पाठलाग करून विक्रांत ठाकूर आणि सुमित पटेल यांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून गुन्ह्यातील वाहन आणि मोबाईल जप्त झाले. मुख्य आरोपी अमित पठारे याला वाघोलीतून ताब्यात घेण्यात आले. सुमित पटेल हा गुन्ह्यापूर्वी आणि नंतरही साथीदारांसोबत असल्याने त्यालाही गुन्ह्यात सामील करण्यात आले.
तापकीर यांचे नाव पुढे…
तपासादरम्यान अटक आरोपींकडून किसन महाराज तापकीर यांचे नाव उघड झाले. खून आर्थिक वाद, व्यावसायिक हितसंबंध कि वैयक्तिक रागातून झाला, याबाबत अद्याप निश्चितता आलेली नाही. मात्र तापकीर यांच्या थेट किंवा अप्रत्यक्ष सहभागाचा तपास सुरू असून त्यांचा शोध घेण्यासाठी स्वतंत्र पथक नियुक्त केले आहे. तपास दिघी पोलिसांकडून वेगाने सुरू असून, प्रकरणातील राजकीय अंगामुळे या खटल्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
“नितीन गिलबिले खून प्रकरणात किसन महाराज यांचा सहभाग निष्पन्न झाला असून त्यांचे नाव आरोपींमध्ये समाविष्ट केले आहे. त्यांचा शोध सुरू आहे.”
– प्रमोद वाघ, वरिष्ठ निरीक्षक, दिघी पोलिस…
















