न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ डिसेंबर २०२५) :- पुनावळे येथील जी. के. आरकॉन सोसायटीमध्ये ‘रेड्डी आन्ना’ या नावाने बेकायदेशीर ऑनलाईन जुगार रॅकेट चालवणाऱ्या तिघांना रावेत पोलीसांनी अटक केली. जून २०२५ पासून ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत सुरू असलेल्या या अनैतिक ऑनलाइन जुगारातून आरोपींनी बनावट कागदपत्रे वापरून बँक खाती उघडली व सामान्य नागरिकांची तब्बल २ लाख ८६ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे तपासात उघड झाले.
या प्रकरणी रावेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी म्हणून पो.शि. सौदागर देविदास लामतुरे यांनी दिलेल्या माहितीवरून आरोपी राजेंद्र लादुलाल गाडरी (२०), तेजेश्वर पिरैय्या राव (२५), चंदनकुमार राजेंद्र पांडे (३०) यांच्यावर कारवाई करण्यात आली. आरोपी फ्लॅटमध्ये बसून प्रतिबंधित बेटिंग वेबपोर्टलद्वारे जुगार खेळवून त्यातून आर्थिक फायदा मिळवत होते.
फसवणूक साखळीत ‘रोहित भैय्या’, ‘चॅकर’ आणि ‘पीयु’ असे अजून काही साथीदार बनावट सिमकार्ड, बँक खाते, एटीएम, पासबुक पुरवून मदत करत असल्याचे समोर आले आहे. आरोपी ऑनलाईन वेब लॉगिनद्वारे पैसे विविध खात्यांमध्ये ट्रान्सफर करत होते. पुढील तपास सपोनि देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.












