न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३ जून २०१९) :- मागील अनेक वर्षांपासून कुदळवाडीत सार्वजनिक स्वच्छतागृहाची मागणी होत आहे. ती अद्यापही पूर्ण झालेली नाही. या परिसरात येणाऱ्या नागरिकांना अन्य पर्याय नसल्याने रस्त्याच्या कडेला एखादा आडोसा पकडून नैसर्गिक विधी आटोपावे लागत आहे. याबाबत स्वी. नगरसदस्य दिनेश यादव यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत स्थापत्य विभागास निवेदन दिले आहे.
यात त्यांनी म्हटले आहे की, कुदळवाडी येथे ठिकठिकाणी स्वच्छतागृह बांधण्यात यावीत, अशी नागरिकांची मागणी आहे. स्वच्छतागृह नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. महिलांनाही स्वच्छतागृहा अभावी मोठय़ा त्रासाला तोंड द्यावे लागत आहे. कुदळवाडीतील लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. महापालिकेने या परिसरात अद्यापपर्यंत एकही स्वच्छतागृह बांधले नाही.
या आधीही स्थापत्य विभागास संपर्क करून, स्वच्छतागृह बांधण्याची मागणी केली होती. अधिकाऱ्यांना जागाही दाखवण्यात आली होती. परंतु, अद्यापपर्यंत महापालिकेकडून स्वच्छतागृह उभारणीबाबत अंमलबजावणी झालेली नाही. तरी आपण या निवेदनाची दाखल घेत, या परिसरात तात्काळ स्वच्छतागृह उभारण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी यादव यांनी या निवेदनाद्वारे केली आहे











