- २२ वर्षीय चालकाला अटक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ डिसेंबर २०२५) :- पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेतील मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई करत तब्बल ₹36,47,900 किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली.
२ डिसेंबर रोजी पथकाला पुणे–मुंबई हायवेवरून MH-12-RN-3203 या ट्रकमधून अवैधरीत्या गुटखा वाहतूक होत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या पथकाने बालेवाडीतील ऑर्चिड हॉटेलजवळ सापळा रचून ट्रक ताब्यात घेतला.
चौकशीत ट्रक चालक नरेश गणेश चौधरी (वय २२, रा. भोसरी) याने उडवा-उडवीची उत्तरे दिल्यानंतर ट्रकची पंचासमक्ष तपासणी करण्यात आली. यात ₹11,47,900 किमतीचा प्रतिबंधित गुटखा आढळला. तसेच ₹25 लाख किंमतीचा टाटा कंपनीचा ट्रकही जप्त करण्यात आला. एकूण ₹36,47,900 चा मुद्देमाल हस्तगत झाला.
या प्रकरणी बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
ही यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) डॉ. शिवाजी पवार, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक रावसाहेब मोटे, श्रेपोउनि महेश खांडे, पोलीस अंमलदार नितीन लोखंडे, गणेश कोकणे, विशाल गायकवाड, पवन वाजे, सुमित देवकर, समीर रासकर, अमर कदम आणि ज्ञानेश्वर कौलगे यांनी सहभाग नोंदवला.
















