- हारमन तर्फे चाकणमध्ये आपल्या ऑटोमोटिव्ह इलेक्ट्रॉनिक्स निर्मितीचा विस्तार
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. ३ जून २०१९) :- सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स कं.लि.ची संपूर्ण उपकंपनी असलेल्या हारमनने आज महाराष्ट्रामधील पुण्याजवळ असलेल्या चाकण मध्ये ऑटोमोटिव्ह निर्मिती प्रकल्पाचा विस्तार करण्यासाठी अतिरिक्त ३५० करोड (५० दशलक्ष डॉलर) ची घोषणा केली.
या प्रकल्पाच्या फेज २ चे उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत, हारमनचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी दिनेश पालिवाल आदी मान्यवर उपस्थित होते. हा प्रकल्प २०१४ साली चाकण येथे स्थापित झाला असून येथे अद्ययावत कनेक्टेड कार्स सोल्युशन्सची निर्मिती केली जाते. ज्यामध्ये भारतीय व जागतिक ग्राहकांसाठी ऑटोमोटिव्ह इन्फोटेन्मेंट युनिटसचा समावेश आहे.
पहिला टप्प्या यशस्वीरित्या कार्यान्वित झाल्यानंतर आता दुसर्या टप्प्यात २०२१ पर्यंत उत्पादन क्षमता तिप्पट वाढेल. जागतिक पातळीवर ग्राहकांच्या इनोव्हेटिव्ह कनेक्टेड कार सोल्युशन्सची मागणी लक्षात घेता हारमन तर्फे चार अद्ययावत एसएमटी असेंब्ली लाईन्स प्रस्थापित केल्या जातील. पुढील तीन वर्षांत डिजिटल कॉकपिट युनिट (डीसीयू) आणि टेलिमॅटीक कंट्रोल युनिट (टीसीयू) ची उत्पादन क्षमता वर्षाला २,००,००० युनिट पासून २५,००,००० युनिट पर्यंत म्हणजेच १२ पट वाढेल. याच कालावधीत फॅक्टरीमधील कर्मचार्यांची संख्या दुप्पट होऊन ८०० पर्यंत पोहचेल. यासाठी केल्या गेलेल्या गुंतवणूकीचे एकूण मूल्य ३५० करोड (५० दशलक्ष डॉलर) इतके आहे.
याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र राज्यामध्ये निर्मिती वाढण्यासाठी आम्ही या नवीन हारमनच्या गुंतवणूकीचे स्वागत करतो. मागील पाच वर्षांपासून आमचे शासन राज्यामध्ये व्यवसायांची वाढ व विकास व्हावा यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. महाराष्ट्र हे भारताचे ऑटो हब झाले आहे.जागतिक पातळीवरचे ऑटोमोटिव्ह ब्रँडस महाराष्ट्रात आहेत आणि ते दरवर्षी क्षमता वाढीचा प्रयत्न करत आहेत त्याचबरोबर सुटे भाग (ऑटोमोटिव्ह कंपोनंटस) देखील स्थानिक पातळीवरून मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे.त्यामुळे संपूर्ण ऑटोमोटिव्ह परिसंस्था विकसित होत आहे.यामुळे इतर गुंतवणूकदारही महाराष्ट्राकडे आकर्षित होतील.गेल्या चार वर्षांत मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राने ईज ऑफ डुईंग बिझनेससाठी अथक प्रयत्न केले आहेत.महाराष्ट्रात उपलब्ध मनुष्यबळ हे सर्वोत्कृष्टपैकी एक आहे आणि पुणे जिल्हा हे एक प्रमुख उत्पादन केंद्र बनले आहे.
नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत म्हणाले, भारत हे मोबिलिटी तंत्रज्ञानाच्या क्रांतीच्या उंबरठ्यावर आहे.ऑटोमोबाईल क्षेत्राचा भारताच्या देशांतर्गत एकूण उत्पादनात (जीडीपी) सात टक्के वाटा आहे.भारतात ऑटोमोबाईल क्षेत्रात वाहनांची वर्षाला एकूण विक्री ही 25.3 दशलक्ष गाड्यांची आहे आणि 2030 पर्यंत त्यात तिप्पटीने वाढ होऊन ८५ दशलक्षपर्यंत जाण्याची अपेक्षा आहे.ऑटोमोबाईल सेक्टरमुळे भारताच्या विकासाला चालना मिळते व मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होते.आर्टिफिशियल इंटेलिजन्स,बिग डाटा व इतर अद्ययावत तंत्रज्ञानामुळे या क्षेत्रात आमुलाग्र बदल होणार आहे.युरोप,मेक्सिको व चीनपेक्षाही भारतात गुंतवणूक करणे हे किफायतशीर व योग्य ठरेल.
हारमनचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी दिनेश सी. पालिवाल याप्रसंगी म्हणाले, हारमन ही ग्लोबल कनेक्टेड कार उद्योगासाठी लागणार्या महत्वाच्या इलेक्ट्रॉनिक सिस्टीम्सकरिता आघाडीची पुरवठादार आहे. भारतामधील व्यवसाय धोरणांमध्ये जलद होणारी सुधारणा आणि व्यवसाय करण्याची सुविधा यांमुळे आम्हाला गुंतवणूक करण्याचा निर्णय घेण्यास मदत झाली. हा महत्वपूर्ण निर्मिती विस्तार आमच्या वाढीच्या योजनांना आणि मेक इन इंडिया स्वप्नाला आधार देणारा आहे. हा आमच्यासाठी महत्वपूर्ण टप्पा आहे आणि भारताप्रती आमची असलेली वचनबद्धता अधोरेखित करते. आमच्याकडे बँगलोर, पुणे आणि दिल्ली याठिकाणी आधीपासूनच आमच्या आर अँड डी सेंटरमध्ये ९००० पेक्षा जास्त विश्वस्तरीय अभियंता आणि वैज्ञानिक आहेत जे आमच्या जागतिक विकासामध्ये सहभाग घेत आहेत. आम्हाला महाराष्ट्र राज्य शासनाकडून मिळणार्या सहकार्यासाठी आम्ही त्यांचे आभारी आहोत.











