न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३ जून २०१९) :- मुस्लीम समाज बांधवांचा ”रमजान ईद” हा सण संपूर्ण देशात उत्साहात साजरा करण्यात येतो. त्यानिमित्ताने देशभरातील हिंदू-मुस्लीम बांधव समजातील जातीय तेढ विसरून एकत्र येतात. पिंपरी चिंचवड शहरातही ईद हर्षोल्हासात साजरी केली जाते.
परंतु, यंदा पिंपरी चिंचवड महापालिकेने शहरात पाणीकपात केली आहे. त्यामुळे या सणावर विरजण पडण्याची शक्यता आहे. पाणीकपातीचा नियम या सणासाठी शिथिल करण्यात यावा, अशी मागणी नगरसदस्य व मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी आयुक्त हर्डीकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
यात त्यांनी म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या वतीने आपणांस विनंती करण्यात येते की (दि. ०५ /०६ / २०१९ किंवा ०६ /०६/ २०१९) रोजी ज्या दिवशी रमजान ईद असेल, त्यादिवशी संपूर्ण वेळ पाणीपुरवठा शहरामध्ये करण्यात यावा. रमजान ईद हा मुस्लिम बांधवांचा मोठा उत्सव असून, शहरातील सर्व नागरिकांना आपण सहकार्य करावे, असे या निवेदनात चिखले यांनी म्हटले आहे.











