न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहू (दि.०९ डिसेंबर २०२५):- तीर्थक्षेत्र देहू येथील भाविकांना अधिक सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी नगरपंचायत प्रशासन सातत्याने प्रयत्नशील असून, वाढत्या लोकसंख्येनुसार नागरिकांच्या मूलभूत गरजा प्रभावीपणे पूर्ण करण्यावर पुढील काळात अधिक लक्ष केंद्रित केले जाणार असल्याची माहिती नगरपंचायतीचे मुख्याधिकारी चेतन कोंडे यांनी दिली. नगरपंचायतीचे पुढील टप्प्यात नगरपरिषदेत रूपांतर होऊन अधिक निधी उपलब्ध व्हावा आणि परिसराचा सर्वांगीण विकास साधता यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
देहू नगरपंचायतीच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ८ डिसेंबर २०२० रोजी देहू ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर झाले. त्यानंतर एका वर्षाच्या प्रशासकीय कालावधीतून पुढे १७ नगरसेवक निवडून आले. त्यानंतर प्रथमच वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमादरम्यान मुख्याधिकारी चेतन कोंडे, कार्यालयीन अधीक्षक प्रियंका कदम आणि नगराध्यक्षा पूजा दिवटे यांच्या हस्ते केक कापून वर्धापन दिन सोहळा पार पडला. नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांच्या उपस्थितीत कार्यक्रमाला उत्साही वातावरण लाभले.
मुख्याधिकारी कोंडे यांनी सांगितले की, तीर्थक्षेत्र म्हणून देहूची ओळख अधिक दृढ करण्यासाठी सुविधा-वृद्धी, स्वच्छता, वाहतूक व्यवस्थापन, रहदारीसाठी उपाययोजना आणि पायाभूत सुविधा यावर भर दिला जाणार आहे. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक प्रकल्प, रस्ते, प्रकाशयोजना आणि पाणीपुरवठा यांसाठीही विशेष नियोजन करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.
देहूच्या विकासाचा पुढील टप्पा अधिक व्यापक आणि नियोजनबद्ध असेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.












