- तरुणांना संधीच्या धोरणामुळे तापकीर यांच्या अपेक्षा बळावल्या…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १० डिसेंबर २०२५) :- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर पिंपरी-चिंचवड शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सर्वाधिक इच्छुकांची संख्या भारतीय जनता पक्षाकडे असून, पक्षाकडून ५ डिसेंबर ते ७ डिसेंबर दरम्यान उमेदवारी अर्जांचे वाटप करण्यात आले होते. हे अर्ज ९ ते १० डिसेंबर रोजी दुपारी चार वाजेपर्यंत पक्ष कार्यालयात जमा करण्याची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे पक्ष कार्यालयांमध्ये अर्ज जमा करण्यासाठी इच्छुकांची मोठी लगबग सुरू आहे.
याच पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २७ मधून राज तापकीर यांनी मंगळवारी (दि. ९) मोठ्या उत्साहात आपला उमेदवारी अर्ज पिंपरी-चिंचवड शहर भाजप अध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे यांच्याकडे सुपूर्त केला. यावेळी माजी नगरसेवक विनायक गायकवाड, भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष दिनेश यादव, विकास डोळस, मधुकर बच्चे आदी उपस्थित होते.
त्यावेळी माध्यमांशी संवाद साधताना राज तापकीर म्हणाले की, “भारतीय जनता पक्ष प्रभाग २७ मधून मला उमेदवारी देईल अशी मला पूर्ण आशा आहे. पक्षाचे ‘तरुणांना संधी’ हे धोरण आणि माझे प्रभागातील सातत्यपूर्ण काम तसेच पक्षाशी निष्ठा या सर्व गोष्टींच्या आधारे मला निश्चित संधी मिळेल,” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
राज तापकीर यांच्या कार्यतत्परतेमुळे आणि पक्षाप्रती असलेल्या निष्ठेमुळे पक्षश्रेष्ठी त्यांच्यावर समाधानी असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे. पक्षाने वेळोवेळी त्यांच्यावर विश्वास दाखवला असून, त्यांनीही तो विश्वास सार्थ ठरवला आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत प्रभाग २७ मधून राज तापकीर यांच्याच उमेदवारीची शक्यता अधिक असल्याची जोरदार चर्चा प्रभागात सुरू आहे.












