न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३ जून २०१९) :- मुस्लीम धर्मियांचा रमजान ईद हा सण अगदी उद्यावर आला असून, सणाच्या खरेदीची धामधूम सुरू झाली आहे. नवीन कपड्यांसह, सुकामेवा व ईदच्या इतर खरेदीसाठी शहरातील दुकाने गर्दीने फुलून गेली आहेत.
रमजान महिन्याचे उपवास सध्या सुरू आहेत. ईदसाठी मुस्लिम बांधवांमध्ये प्रचंड उत्साह आहे. यानिमित्त नवीन कपडे व विविध वस्तूंनी बाजारपेठ सजली असून, खरेदी करण्यासाठी मुस्लिम बांधवांची गर्दी होत आहे. पिंपरीतील विविध ठिकाणी रमजान ईदसाठी आवश्यक असणाऱ्या विविध वस्तूंची दुकाने सजली आहेत. रेडिमेड कपड्यांच्या दुकानात ईद सणासाठी खास विविध प्रकारचे आकर्षक ड्रेस व साड्या उपलब्ध असून, त्यांना चांगली मागणी आहे. ईदसाठी लहान मुलांना कपडे घेण्यासाठीही बाजारात गर्दी होत आहे.
सुकामेवा खरेदी जोरात
रमजान ईदचे वैशिष्ट्य असलेल्या शिरखुर्मासाठी लागणाऱ्या शेवया व सुकामेवा यांची खरेदी करण्यासाठी ग्राहकांचे प्राधान्य आहे. विविध प्रकारच्या शेवया बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. याशिवाय सुकामेव्याच्या दुकानांमध्येही ग्राहकांची गर्दी दिसत आहे. बदाम, पिस्ता, काजू, खारीक यांच्यासोबत विविध प्रकारचे खजूरसुद्धा बाजारात उपलब्ध आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत भाव स्थिर असून खरेदीला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे विक्रेत्यांचे मत आहे.











